हिंगोलीत खासदार हेमंत पाटील भरविणार अधिकाऱ्यांची 'शाळा'

मंगेश शेवाळकर
मंगळवार, 25 जून 2019

  • खासदार हेमंत पाटील यांनी भौतिक सुविधांची माहिती मागवली, शाळांना भेटी देणार
  • स्वच्छतागृहाची दुरावस्था झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण
  • ​शाळा आदर्श करण्यासाठी काय उपाय योजना कराव्या लागतील याची माहिती सादर करण्याच्या सुचना

हिंगोली : जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून सुविधांचे कागदीघोडे नाचविणाऱ्या शिक्षण विभागाकडून शाळेतील भौतिक सुविधांची माहिती मागविण्यात आली असून पुढील काही दिवसांतच खासदार हेमंत पाटील जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची 'शाळा' भरविणार असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे 870 शाळा असून या शाळांमधून विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या भौतिक सुविधा नाहीत. अपुऱ्या वर्ग खोल्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागत आहे तर काही ठिकाणी स्वच्छतागृहाची दुरावस्था झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण होऊ लागली आहे. याशिवाय शाळा खोल्यावरील टीनपत्रे फुटल्याने पावसाळ्यात वर्ग खोल्या गळत असून शाळा इमारतीला तडे गेल्यामुळे विद्यार्थ्यांना जीवमुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे.

जिल्ह्यातील शाळांमधून सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे कागदी घोडे प्रशासनाकडून नाचवले जात आहेत. प्रत्येक बैठकांमधून सर्व काही अलबेल असल्याचे दाखविले जात आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवितांनाही चुकीची माहिती पाठवली जात असल्याचे चित्र आहे. त्यानंतर आता खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हा परिषदेला पत्र पाठविले आहे.

यामध्ये शाळेची पटसंख्या, उपस्थिती संख्या, शिक्षक मंजूर संख्या, किती शिक्षकांची आवश्यकता आहे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, संरक्षण भिंत, विज पुरवठा, मैदान, वॉटर फिल्टर, विजेवर चालणारी उपकरणे, वाचनालय, व्यायामशाळा आहे काय, शाळेत मिळणारा पोषण आहाराचा दर्जा कसा आहे, संगणक आहेत काय, शाळा आदर्श करण्यासाठी काय उपाय योजना कराव्या लागतील याची माहिती सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे आता शाळांमधून सुविधांचे बिंग फुटणार आहे. 

खासदार देणार शाळांना भेटीदरम्यान, सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर खासदार श्री. पाटील स्वतः काही शाळांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिलेला अहवाल व प्रत्यक्षात असलेली स्थिती याचा शाळानिहाय आढावा घेणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Hemant Patil is inspecting Zilla Parishad schools at hingoli