परभणीत मेडिकल कॉलेज न झाल्यास राजकारण सोडेन - खासदार संजय जाधव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जून 2019

परभणी - परभणी हा सर्वांत जुना जिल्हा असला, तरी बेरोजगारी दूर करण्यासाठी काही प्रयत्न झाले नाहीत, ही शोकांतिका आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि एखादा मोठा प्रकल्प (युनिट) सुरू करण्यासाठी प्राधान्य असेल, असे आश्‍वासन खासदार संजय जाधव यांनी दिले. परभणीत वैद्यकीय महाविद्यालय न झाल्यास राजकारण सोडून देईन, असेही ते म्हणाले.

येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. संजय टाकळकर व मित्रपरिवारातर्फे धर्मापुरी (ता. परभणी) येथे रविवारी (ता. नऊ) खासदार जाधव यांचा सत्कार झाला. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ अशोक सोनी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, विश्व हिंदू परिषदेचे संजय शेळके, नगरसेवक मधुकर गव्हाणे, विजय ठाकूर, आयोजक डॉ. टाकळकर आदी उपस्थित होते.

परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी खासदार जाधव यांनी जनआंदोलन उभारले होते. त्यामुळे महाविद्यालय उभारणीच्या अनुषंगाने समितीद्वारे चाचपणीही झाली होती. आता केवळ मंजुरीची प्रतीक्षा आहे. आता खासदार जाधव यांनीच हा प्रश्न निकाली काढण्यासाठी आपले वजन वापरावे, अशी विनंती ॲड. सोनी यांनी केली.

त्यावर खासदार जाधव म्हणाले, ‘पहिल्यापासूनच या महाविद्यालयासाठी आग्रही आहे. त्याच्या मंजुरीसाठी निश्‍चितच प्रयत्न होतील. त्याशिवाय केंद्र सरकारच्या माध्यमातून आणखी एखादा मोठा प्रकल्प परभणीत आणण्यासाठी प्रयत्न असेल. त्यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार आहे.’ प्रास्ताविक डॉ. टाकळकर यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sanjay Jadhav comment