आठ हजारांवर उमेदवारांनी दिली राज्यसेवा पूर्व परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

औरंगाबाद - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०१८ रविवारी (ता. ८) शहरात ३१ उपकेंद्रांवर पार पडली. या परीक्षेसाठी १० हजार ७५७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. पैकी पहिल्या सत्रात सकाळी १०ः३० ते १ या वेळेत आठ हजार ८६०, तर दुसऱ्या सत्रात तीन ते सायंकाळी पाच यावेळेत आठ हजार ८१६ जणांनी परीक्षा दिली. 

औरंगाबाद - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०१८ रविवारी (ता. ८) शहरात ३१ उपकेंद्रांवर पार पडली. या परीक्षेसाठी १० हजार ७५७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. पैकी पहिल्या सत्रात सकाळी १०ः३० ते १ या वेळेत आठ हजार ८६०, तर दुसऱ्या सत्रात तीन ते सायंकाळी पाच यावेळेत आठ हजार ८१६ जणांनी परीक्षा दिली. 

ही परीक्षा शहरातील सर्व परीक्षा केंद्रावर सुरळीत पार पडली. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवारांनी आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणत्याही एका ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. तसेच हॉलमध्ये ११ वाजेनंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले गेले नाहीत. 

केंद्राच्या प्रवेशद्वारावरच परीक्षार्थ्यांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत होती. परीक्षेच्या पर्यवेक्षणा करण्यासाठी आयोगाचे अधिकारी स्वतः उपस्थित राहिले होते. परीक्षेच्या कामासाठी १ हजार ५० अधिकारी/कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली.

नियमांचे पालन करत दिली परीक्षा 
परीक्षार्थ्याने डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लूटूथ, कॅमेराफोन किंवा यासारखे कोणतेही संदेशवहन उपकरण, कोणतेत्याही प्रकारचे इलेक्‍ट्रॉनिक साहित्य परीक्षा हॉलमध्ये नेण्यास मनाई केली होती. तसेच परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षांकरिता बंदी घालण्यात येणार, असे कडक नियम घालून दिल्याने उमेदवारांनी नियमांचे पालन केल्याचे दिसून आले.

जेईई परीक्षेला १५ हजारांवर विद्यार्थी
सीबीएसईतर्फे घेण्यात येणारी जेईई मेन्स (जॉइंट एंट्रन्स एक्‍झाम) रविवारी (ता. आठ) औरंगाबादेतील ३२ केंद्रांवर घेण्यात आली. दोन सत्रांत पार पडलेल्या या परीक्षेसाठी १५ हजार १२० विद्यार्थी बसले होते. पहिल्या सत्रात सकाळी साडेनऊ ते साडेबारा या वेळेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयाचा पेपर घेण्यात आला. तर दुसऱ्या सत्रात दोन ते सायंकाळी पाच या सत्रात आर्किटेक्‍चर या विषयाचा पेपर पार पडला. यामध्ये अभियोग्यता चाचणीचा (ॲप्टिट्यूड टेस्ट) समावेश होता.

जेईई मेन्स या परीक्षेच्या देखरेखीसाठी दिल्ली येथील तीन वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही परीक्षा शांततेत पार पडली, परीक्षेत कोणत्याही ठिकाणी कोणताही गैरप्रकार आढळला नाही.
- पी. संतोषकुमार, जेईई मेन्स परीक्षा, शहर समन्वयक

Web Title: MPSC premier exam