एसटी, तुझा आरोग्यावर भरोसा नाही का?

msrtc news latur
msrtc news latur

लातूर : दिव्यांगांना आरोग्य विभागाकडून स्वावलंबन कार्डसाठी विविध कागदपत्रे घेतली जातात. पुन्ही हीच कागदपत्रे घेऊन एसटी महामंडळाकडून दिव्यांगांना प्रवासभाड्यात सवलतीसाठी स्मार्टकार्ड देण्यात येते. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत ही बाब लक्षात येताच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना तुमचा आरोग्य विभागावर भरोसा नाही का? असा प्रश्न केला. स्वावलंबन कार्डावरूनच स्मार्टकार्ड देण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. 

दिव्यांगांना आरोग्य विभागाकडून स्वावलंबन कार्ड देण्यात येते. यासाठी दिव्यांगांना ऑनलाइन नोंदणी करावी लागते. स्वावलंबन कार्ड देताना संबंधित दिव्यांग व्यक्तींकडून पॅनकार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र तसेच अधिवासी प्रमाणपत्र आदी कागदपत्रे घेण्यात येतात. हे कार्ड दिल्यानंतर त्यावरून दिव्यांगांना एसटीच्या बसमध्ये प्रवासभाड्यात सवलतीसाठी स्मार्टकार्ड देण्यात येते.

स्मार्टकार्डसाठी कागदपत्रे

प्रवासभाड्यात दिव्यांगांना 75 टक्के सवलत आहे. स्वावलंबन कार्डावरून स्मार्टकार्ड देताना राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) पुन्हा सर्व कागदपत्रांची मागणी दिव्यांग व्यक्तींकडे केली जाते. स्वावलंबन कार्डसाठी एकदा कागदपत्रे घेतल्यानंतर पुन्हा स्मार्टकार्डसाठी कागदपत्रे देताना दिव्यांगांची कसरत होते. ही बाब श्रीकांत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर स्वावलंबन कार्ड व दिव्यांगाची छायाचित्रे घेऊन स्मार्टकार्ड दिले पाहिजे. त्यामुळे दिव्यांगांना होणारा त्रास कमी होईल, असे सांगत एसटीच्या अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले. हे निर्देश दिल्यानंतर "एसटी, तुझा आरोग्यावर भरोसा नाही काय,' असा प्रश्न त्यांनी केला व बैठकीत एकच हशा पिकला.

दरम्यान, श्रीकांत यांनी दिलेल्या आदेशावर पुढील कार्यवाही करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. दिव्यांगांना स्मार्टकार्ड देण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे घ्यावीत, याबाबत दिलेल्या महामंडळाच्या सूचना तपासून पाहण्यात येतील. त्याबाबत जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या निदर्शनास आणून देऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे एसटीचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com