मुंबईचे डबेवाले भागवतात दोन लाख जणांची भूक

सुषेन जाधव
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

रितेश आंद्रे : शहरातील सीए संघटनेला व्यवस्थापनाचे धडे

 

औरंगाबाद : मुंबईत पाच हजारांवर डबेवाले अगदी शिस्तीत दोन लाख ग्राहकांची भूक भागविण्याचे कार्य करतात. ब्रिटिशांच्या काळात सुरू झालेली "मुंबईचा डबेवाला' ही सुविधा आजही तितक्‍यात नेटाने सुरू आहे,'' अशी माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे मुख्य समन्वयक रितेश आंद्रे यांनी दिली. शनिवारी (ता. 12) सीए संघटना व विद्यार्थी संघटना अर्थ (डब्ल्यूआयआर सीए) यांच्यातर्फे सातारा परिसरातील एमआयटी कॉलेजसमोरील आयसीएआय भवनात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

व्यासपीठावर सीए संघटनेचे अध्यक्ष रोहन आचलिया, ग्राउंड लेव्हलवर काम करणारे मुंबई डबेवालाचे किरण सावंत आणि सीए उमेश शर्मा यांची उपस्थिती होती. श्री. आंद्रे म्हणाले, ""वर्ष 1890 मध्ये 100 ग्राहकांपासून सुरू झालेला प्रवास आजवरच्या 130 वर्षांत दोन लाख ग्राहकांपर्यंत आला आहे. कोलंबिया, न्यूयॉर्क, अमेरिकासह विविध देशांत "मुंबई डबेवाला' या विषयावर केस स्टडी केली जात आहे. मुंबई डबेवालाची सेवा, कार्याची सचोटी आदी सर्व पाहून हजारोंवर प्रमाणपत्रे मिळाली आहेत; परंतु ती कोणतीच प्रमाणपत्रे दर्शनी भागात लावली नाहीत. कारण प्रमाणपत्रामुळे आम्ही नाहीत. आमच्यामुळे प्रमाणपत्र आहेत. आयुष्यात प्रमाणपत्रापेक्षा आपल्या कार्याला महत्त्व द्या, आपले कार्यच आपल्याला नवी ओळख मिळवून देते.'' बांद्रा परिसरात किती डबे कोठे, किती, कसे पाठवायचे, याचे सर्व नियोजन करणारे महादेव पांगरे यांच्यासह शिवाजी कुडेकर, सीए अकुला नागार्जुन राव, सीए रेणुका देशपांडे, संघटनेचे गणेश शीलवंत, प्रवीण बांगड, पंकज सोनी, रूपाली बोथरा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलराम मनिठे यांनी केले. 

गरम डबा एका तासात पोचतो कसा? 
डबा बनविल्यापासून केवळ एका तासात तो ग्राहकांपर्यंत कसा पोचतो, याचे कौशल्य श्री. आंद्रे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, ""डब्याच्या झाकणावर त्या-त्या एरियाचा, अपार्टमेंट किंवा ऑफिस, तसेच घर क्रमांक आदींचा कोड लिहिला जातो. त्यामुळे नेमक्‍या ठिकाणी आणि नेमक्‍या वेळेत डबा पोचविला जातो.'' 

आजवर एकदाही संप नाही 
वारकरी संप्रदायाचा वारसा मुंबई डबेवाल्यांमध्ये आहे. त्यामुळे अन्न खाऊ घालताना होणाऱ्या आनंदाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. ही भावना डबेवाल्यांची असल्याने 130 वर्षांच्या प्रवासात आजवर एकदाही एकाही डबेवाल्याने विविध मागण्यांसाठी बंद, आंदोलने केली नाहीत, याचा आवर्जून उल्लेखही श्री. आंद्रे यांनी केला. 

सामाजिक भानही जपले 
मुंबईच्या डबेवाल्यांनी नुकत्याच येऊन गेलेल्या कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी पाच दिवस कॅम्पेन राबवून जवळपास दहा ते पंधरा लाखांची मदत केली आहे; तसेच डबेवाल्यांतर्फे "रोटी बॅंके'च्या माध्यामातून शिल्लक राहिलेले अन्नही गरजूपर्यंत पोचविले जाते. याशिवाय डबेवाले हे स्वतःच्या डब्यासोबतच लहान मुलांसाठी एक डबा ठेवतात, तो गरजू लहान मुलांपर्यंत पोचविण्याचीही ते जबाबदारी घेतात. 

डब्यासाठी मिळाला रेल्वेचा डबा 
वर्ष 2010 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातर्फे संचलनादरम्यान मुंबई डबेवालाचे सादरीकरण करण्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मुंबईत लोकलमध्ये डबे घेऊन जाताना प्रवासी डब्यावर पाय ठेवून बसतात, अशी अडचण मांडली. त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच रेल्वे डब्याचा सामानासाठीचा डबा केवळ डबेवाल्यांसाठी आरक्षित झाल्याचेही श्री. आंद्रे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai Dabewala feeding 2 lakh citizens of mumbai