मुंबई-नागपूर मार्गावर टोलची "समृद्धी'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मे 2019

राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा "मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग' आता आकार घेतो आहे. या रस्त्यावरून प्रवास करायचा झाल्यास चारचाकी वाहनाला प्रतिकिलोमीटर एक रुपया 65 पैसे असा टोल भरावा लागेल. म्हणजेच या महामार्गाचे एकूण 701 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी एका मोटारीला एक हजार 156 रुपये 65 पैसे मोजावे लागणार आहेत.

औरंगाबाद - राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा "मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग' आता आकार घेतो आहे. या रस्त्यावरून प्रवास करायचा झाल्यास चारचाकी वाहनाला प्रतिकिलोमीटर एक रुपया 65 पैसे असा टोल भरावा लागेल. म्हणजेच या महामार्गाचे एकूण 701 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी एका मोटारीला एक हजार 156 रुपये 65 पैसे मोजावे लागणार आहेत.

समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुंबई आणि नागपूर ही दोन शहरे आणि एकूण दहा जिल्हे जोडले जाणार आहेत. या कामाचे औपचारिक भूमिपूजन राहिले असले, तरी त्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या रस्त्याचे रेखांकन 150 किलोमीटर प्रतितास वेगाच्या वाहनासाठी तयार करण्यात आले आहे. तरीही प्रतितास 120 किलोमीटर वेगाची मर्यादा घालण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी मंगळवारी (ता.28) शहरात झालेल्या एका बैठकीत याविषयी सांगितले. वाहनचालकांना सरासरी प्रत्येक किलोमीटरला एक रुपया 65 पैसे मोजावे लागतील. या मार्गावरून प्रवास करताना 701 कि.मी. अंतर पार करण्यासाठी एका मोटारीला एक हजार 156 रुपये 65 पैसे मोजावे लागणार आहेत. वाहनाच्या क्षमता जशा वाढतील तसा दर वाढणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 2021 मध्ये या रस्त्याचे काम पूर्ण होऊन तो वाहनांसाठी खुला करण्याकरिता "एमएसआरडीसी' प्रयत्नशील आहे. या निर्मितीचा कालावधी धरून एकूण 40 वर्षे या रस्त्यावर टोल कायम राहणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.

चौपदरी रुंद असलेल्या समृद्धी महामार्गाचे कालांतराने विस्तारीकरण करायचे असल्यास त्यासाठी वाव आहे. आवाज आणि तापमान आटोक्‍यात ठेवण्यासाठी सुमारे आठ लाख झाडे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लावण्यात येतील.
- अनिलकुमार गायकवाड, सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

टोलचे गणित
701 कि.मी - एकूण अंतर
1.65 पैसे - प्रतिकिलोमीटर
1,156 रु - संपूर्ण महामार्गासाठी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Nagpur Route Toll Samruddhi Highway