मुंबईच्या गाड्या परळीमार्गे धावल्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

पनवेल एक्‍स्प्रेस रद्द
नांदेड ते पनवेल एक्‍स्प्रेस गाडी रविवारी (ता. २८) रद्द करण्यात आली. त्यामुळे परतीला येणारी पनवेल ते नांदेड गाडीही रद्द झाली. तत्पूर्वी ही गाडी पुणे ते पनवेलदरम्यान रद्द केली होती. परंतु पुण्यापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असून त्यांनी आरक्षण करून ठेवले होते. ते रद्द करावे लागले आहे.

परभणी - मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सहा एक्‍स्प्रेस गाड्या रविवारी (ता. २८) परभणीमार्गे सोडण्यात आल्या आहेत. त्यातील पाच एक्‍स्प्रेस परळीमार्गे धावल्या असून एक गाडी नांदेडमार्गे हैदराबादला गेली. 

एकूण सहा गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला. त्या प्रामुख्याने लोणावळा, पुणे, कुर्डुवाडी, लातूररोड मार्गे कर्नाटक व आंध्र प्रदेशात जातात. परंतु मार्ग बदलण्यात आल्याने या गाड्या नाशिक, मनमाड, औरंगाबाद, परभणी, परळी, लातूररोड येथून बीदर तसेच विकाराबादकडे धावल्या. त्यात मुंबई ते भुवनेश्वर एक्‍स्प्रेस, इंदौर ते लिंगमपल्ली एक्‍स्प्रेस, मुंबई ते कन्याकुमारी एक्‍स्प्रेस, मुंबई ते नगरसोल एक्‍स्प्रेस, मुंबई ते मद्रास (चेन्नई) एक्‍स्प्रेसचा समावेश होता. दुसरीकडे मुंबई ते हैदराबाद गाडी मनमाड, नांदेडमार्गे हैदराबादला गेली. वरील पाचही गाड्यांची क्रॉसिंग हैदराबाद ते औरंगाबाद पॅसेंजरसोबत घेण्यात आली. त्यामुळे या पॅसेंजर गाडीला परभणी स्थानकावर येण्यास तीन तास उशीर झाला. येथून इंजिन बदलून ती पुढे सोडण्यास साडेबारा वाजले. ती औरंगाबादला दुपारी सव्वादोनऐवजी सायंकाळी पाच वाजता पोचली. 

गाड्यांचा अचानक मार्ग बदलल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला. त्याची पूर्वकल्पना त्यांना नव्हती. जवळपास सर्वच गाड्यांना विलंबाला सामोरे जावे लागल्याने प्रवाशांना वेळेवर पोहचता आले नाही. 

नांदेड विभागाचे ढिसाळ नियोजन
एकाच दिवशी सहा गाड्या नांदेड विभागातून धावत असताना त्याची कल्पना प्रवाशांना देण्यात आली नाही. या गाड्यांची घोषणा होऊ लागल्यावर प्रवाशांना त्याची माहिती मिळाली. या बदलाची पूर्वकल्पना प्रवाशांना देणे आवश्‍यक होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Railway turn via parli by rain water