अडचणींमुळेच सोनवणेंच्या बॅनरवर मुंदडांचे फोटो 

अडचणींमुळेच सोनवणेंच्या बॅनरवर मुंदडांचे फोटो 

बीड - "आमचा एकच नेता- पवार साहेब' अशी बॅनरबाजी करणाऱ्या आणि सभांमधून थेट बोलणाऱ्या सभापती बजरंग सोनवणेंच्या बॅनरवर नंदकिशोर मुंदडांचे फोटो दिसायला लागले आहेत. उमेदवारी मिळवण्यापासून पती-पत्नीच्या विजयाचे गणित जुळवण्यासाठीच मुंदडांची गरज पडली आणि आता "ना गट ना तट'ची उपरती झाली, असे मुंदडा समर्थक बोलू लागले आहेत. विशेष म्हणजे हा बदल केवळ 19 दिवसांतला आहे. 

शिक्षण सभापती बजरंग सोनवणेंची राजकीय वाटचाल दिवंगत नेत्या विमलताई मुंदडा यांच्यापासून झाली; पण पुढे राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी त्यांनी "इकडून तिकडे' केले. फिरून राष्ट्रवादीत आलेल्या सोनवणेंनी केज तालुक्‍यात स्वतंत्र गट निर्माण केला. त्यासाठी त्यांनी शक्‍यतो मुंदडांना "बायपास' आणि वेळप्रसंगी "आव्हरटेक' करण्याचे प्रयत्नही केले. नंदकिशोर मुंदडांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या आंदोलनात सहभागी होण्याऐवजी त्यांनी नेहमी स्वतंत्र आंदोलने करून मुंदडा आपले नेते नसल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, "आपले एकच नेते पवार' अशा फेसबुक पेजवर पोस्टही असत. त्यांच्या सभापतिपदाच्या काळात झालेल्या उद्‌घाटनांच्या कुठल्याच कार्यक्रमाला त्यांनी मुंदडांना बोलावले नाही. अनेक स्थानिक निवडणुका किंवा गावपातळीवरील विषयांत मुंदडा समर्थकांना अडचणीत आणल्याचेही प्रकार घडले. या सर्व प्रकारांमुळे एकदा सोनवणेंनाही "ताकद कळू द्या' अशी भूमिका घेत केज नगर पंचायत निवडणुकीतून मुंदडांनी अंग काढून घेतले; पण पक्षाला येथे सपाटून मार खावा लागला. केज विधानसभा निवडणुकीतही सोनवणेंची भूमिका लपून राहिली नाही. दरम्यान, आता जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची पुन्हा सत्ता यावी, यासाठी पक्षश्रेष्ठी आग्रही आहेत. जर "निवडून आणायची जबाबदारी आमच्याकडे' तर मतदार संघातील गट - गणांचे "उमेदवार ठरवण्याचे अधिकारही द्या' अशी भूमिका राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी घेतली. यानुसार पक्षाने सर्वच विधानसभा मतदारसंघ प्रमुखांच्या हाती पक्षाचे एबी फॉर्म दिले. त्यामुळे "मीच नेता' म्हणणाऱ्या सोनवणेंना उमेदवारीसाठी मुंदडांकडे जावे लागले. 16 जानेवारीच्या सोनवणेंच्या फेसबुक पोस्टमध्ये पवारांसह बीड, परळीच्या नेत्यांचे फोटो होते, मुंदडांचा नव्हता; मात्र आता स्वत: चिंचोली, तर पत्नी सारिका सोनवणे युसूफवडगावातून उभ्या असून येथे आव्हानही तगडे आहे. त्यामुळेच त्यांना "ना गट - ना तट' अशी उपरती आली असावी. कारण, रविवारी (ता. पाच) त्यांनी तशी पोस्ट करीत बॅनरवर मुंदडांचा फोटो टाकला आहे. 

अस्वस्थ कार्यकर्त्यांचे काय 
केज मतदारसंघावर दिवंगत विमलताई मुंदडांपासून 25 वर्षे मुंदडांचे वर्चस्व आहे. तेव्हापासून या घराशी कार्यकर्ते जोडलेले आहेत; पण मुंदडांना अपमानित करण्याबरोबरच अडचणीत (विधानसभा निवडणुकीत) आणण्याची संधीही स्वपक्षातील नेत्यांनी सोडलेली नाही. त्यामुळे आता मनोमिलनाची भाषा होत असली तरी मुंदडा समर्थकांच्या कार्यकर्त्यांच्या मनातील खदखदीचे काय असा प्रश्‍न आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com