थकबाकीदाराच्या घरासमोर महापालिका वाजवणार बॅंड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

चालू आर्थिक वर्षाचे मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट २३० कोटी

औरंगाबाद - मोठ्या थकबाकीदारांकडे करवसुलीसाठी तगादा लावून थकलेल्या महापालिका प्रशासनाने आता थकबाकीदाराची माहिती त्याच्या आजुबाजूच्या लोकांना माहीत व्हावी, किमान आपल्या प्रतिष्ठेसाठी तरी हे थकबाकीदार मालमत्ता कर भरतील, या उद्देशाने थकबाकीदारांच्या घरासमोर बॅंड वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून प्रामुख्याने शैक्षणिक संस्थांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दरम्यान, या आर्थिक वर्षात डिसेंबरअखेरपर्यंत ६३ कोटी रुपयांची वसुली झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

महापालिकेचे चालू आर्थिक वर्षाचे मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट २३० कोटी रुपये असून यात १५० कोटी थकबाकी तर चालू आर्थिक वर्षाची मागणी ८४ कोटी रुपयांचा समावेश आहे. डिसेंबरअखेरपर्यंत ६३ कोटी रुपये वसूल झाले असून यात नोटाबंदीचा बराचसा वाटा आहे. करवसुली विभागातील सूत्रांनी गेल्या वर्षीच्या या तारखेपर्यंतच्या तुलनेत १० कोटीने वाढ झाल्याचा दावा केला आहे. आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी करवसुलीवर भर दिला आहे. यासाठी मोठ्या थकबाकीदारांची बारकाईने यादी तयार करण्याचे काम सुरू असून काहींची यादी तयार झाली असून शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था व व्यावसायिकांच्या याद्या तयार करणे अंतिम टप्प्यात आहे. तसेच महावितरणकडील २ कोटी, सेन्ट्रल एक्‍साईज १ कोटी ३५ लाख, तर रेल्वे विभागाला १ कोटी ७८ लाख रुपयांची थकबाकी भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. 

शैक्षणिक संस्था आणि महापालिका यांच्यात मालमत्ता कर कोणत्या दराने लावावा याबाबत वाद आहेत. शैक्षणिक संस्थांची अपेक्षा आहे की निवासी दराने कर आकारणी करावी, तर महापालिका व्यावसायिक दराने कर आकारणी करते. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मध्यस्थीनंतरही यात फारसा मार्ग निघालेला नाही. उलट आता महापालिका प्रशासनाने शैक्षणिक संस्थांना लक्ष्य करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले असून आगामी काही दिवसांत शिक्षण संस्थांचा आक्रोश उसळून येण्याची चिन्हे आहेत.

उर्वरित ७८ दिवसांत १६७ कोटी रुपये करवसुली करावी लागणार आहे. प्रतिदिन किमान सव्वा दोन कोटी रुपये या सरासरी गतीने ही वसुली करावी लागणार आहे. त्याकरिता प्रशासनाने अधिक कठोर धोरण स्वीकारले आहे. व्यावसायिक दराने कर आकारणी करण्यात आलेल्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून येत्या काही दिवसातच या थकबाकीदारांच्या घरासमोर करवसुलीसाठी बॅंड वाजवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बॅंड वाजण्याच्या बदनामीपोटी प्रतिष्ठित व्यापारी कर भरतील, अशी महापालिकेला अपेक्षा आहे. 

Web Title: municipal band music to arrears home