बिलांसाठी मला नका भेटू, आयुक्तांनी झटकली जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - शहरातील विविध भागांत विकासकामे केल्यानंतर महापालिकेकडून बिले निघत नसल्याने कंत्राटदारांच्या सध्या खेट्या सुरू आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी आपल्या दालनाबाहेर देयके, धनादेशासाठी मला भेटू नये, लेखा विभागात संपर्क साधावा, असा फलकच लावला आहे. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने सध्या कामे ठप्प आहेत. दुसरीकडे आतापर्यंत झालेल्या कामांची बिले देताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे. सध्या १७० कोटींच्या सुमारास बिले प्रलंबित आहेत. त्यात आयुक्त डॉ. निपुण विनायक हे मागील महिन्यात दहा दिवसांच्या सुटीवर असताना लेखा विभागाने १८ कोटी ५० लाखांची बिले काढल्याचे समोर आले. त्यामुळे लेखा विभाग चर्चेत आला. दरम्यान, या प्रकरणी आयुक्तांनी चौकशी समिती नेमली आहे. 

त्यात लेखा विभागाने कंत्राटदारांची ज्येष्ठता यादी की-ऑसवर लावली असली तरी ही बिले केव्हा मिळतील हे निश्‍चित नाही. म्हणून कंत्राटदारांच्या खेट्या सुरूच आहेत. काही कंत्राटदार थेट आयुक्तांना देखील भेटतात. त्यामुळे त्यांनी दालनासमोर ‘देयके, धनादेश मिळण्यासाठी आयुक्तांना भेटू नये ही विनंती. त्यासाठी मुख्य लेखाधिकारी, लेखा विभागाशी संपर्क साधावा’ असा फलक लावला आहे.

Web Title: municipal bill issue commissioner nipun vinayak