महापालिकेची शहर स्वच्छता 434 पैकी 299 क्रमांकाची

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

औरंगाबाद - स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रीय पथकाने केलेल्या सर्वेक्षणात औरंगाबाद महापालिका 299 व्या क्रमांकावर गेली असून अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये समावेश झाला आहे. तर राज्यातील 44 शहरांमधून औरंगाबाद शहर 35 व्या क्रमांकावर गेले आहे. औरंगाबादला केवळ 794 गुण मिळाले आहेत. त्यामुळे तत्कालीन आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह घनकचरा विभागातर्फे करण्यात येणारा टॉप टेनचा दावा फुसका बार ठरला. गेल्या वर्षी 73 शहरांपैकी महापालिका 56 व्या क्रमांकावर होती.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक स्वच्छता, घनकचऱ्याचे व्यवस्थापन, कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प, वैयक्‍तिक स्वच्छतागृहांची उद्दिष्टपूर्ती या बाबींचे केंद्रीय पथकाने सर्वेक्षण केले. देशभरातील 434 शहरे या स्पर्धेत सहभागी झाली होती.

स्वच्छ शहरांच्या यादीत पहिल्या टॉप टेनमध्ये येऊन होणार नाही एवढे नाव केंद्रीय पथक प्रमुखाला लाच घेताना झालेल्या अटकेमुळे सर्वत्र झळकले. यानंतर आपण सुटलो असे घनकचरा विभागाला वाटले; मात्र नंतर दुसऱ्या पथकाने कोणालाही न भेटता, कोणाचा चहाही न पिता काटेकोरपणे सर्वेक्षण केल्यानंतर शहराचा 434 मधून 299 वा क्रमांक लागला.

सर्वेक्षणाआधीच गमावले गुण
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा प्रकल्पच नसल्याने महापालिकेने आधीच यासाठी दिले जाणारे गुण गमावले होते. यानंतर समिती येण्यापूर्वीच जनजागृती करणारे पोस्टर जागोजागी लावण्यात आले आणि या स्पर्धेत आपले शहर पहिल्या दहामध्ये आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. मार्चपूर्वी सात हजार वैयक्‍तिक स्वच्छतागृहे बांधण्याचे उद्दिष्ट होते तेही पूर्ण झालेले नाही. पथक येणार म्हणून सार्वजनिक ठिकाणी ते भेटी देईल हे गृहीत धरुन त्या ठिकाणची सफाई करण्यात आली; मात्र पथक भलतीकडेच पाहणी करण्यासाठी जात असल्याने घनकचरा विभागाचे पितळ उघडे पडत गेले. त्यात केंद्रीय पथकाचा प्रमुख लाचेच्या जाळ्यात सापडल्याने महापालिकेच्या पथ्यावर पडले.

तयारीशिवाय केलेला टॉप टेनमध्ये येण्याचा दावा ठरला फुसका बार
गेल्या वर्षी होती 56 व्या क्रमांकावर
राज्यातील 44 शहरांमधून औरंगाबाद 35 वे

Web Title: municipal city celaning no. 299