विभागीय आयुक्तालयामध्ये भरला "महापालिका दरबार' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

औरंगाबाद - मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना भेटण्यासाठी महापालिकेतील अधिकारी व आजी-माजी नगरसेवकांनी मंगळवारी (ता. 3) गर्दी केली होती. विविध प्रकरणांमध्ये निलंबित काही अधिकारीही आयुक्तांच्या भेटीसाठी आले होते. साहजिकच कार्यालयीन परिसरात याची चर्चा रंगली. 

औरंगाबाद महापालिका आयुक्तपदावर असताना कारकीर्दीच्या शेवटच्या काळात डॉ. भापकर यांनी शहरातील अनेक भागांमध्ये रस्ता रुंदीकरणाची धडक मोहीम राबविली. या धडाकेबाज मोहिमेमुळे शहरवासीयांमध्ये सदैव त्यांची सकारात्मक चर्चा असते. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त पदावर त्यांची बदली झाल्याने डॉ. भापकर यांचे शहरात पुनरागमन झाले. पदभार स्वीकारण्याचे सोपस्कार शनिवारी (ता.31) पार पडल्यानंतर सोमवारी त्यांनी आयुक्तालयातील विविध विभागांना भेटी देत माहिती घेतली. मंगळवारी मात्र आयुक्तालयात महापालिकेचे अनेक अधिकारी दिसायला सुरवात झाली. काही आजी-माजी नगरसेवकही नूतन विभागीय आयुक्तांच्या भेटीसाठी आले. विशेष म्हणजे अनेक प्रकरणांत सध्याच्या महापालिका आयुक्तांनी निलंबित केलेले अनेक अधिकारीही जुन्या आयुक्तांना भेटण्यासाठी आवर्जुन आले होते. याशिवाय महसूलच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनीही नूतन आयुक्तांचे स्वागत केले. 

विभागीय आयुक्तालयाच्या बाहेरील रस्त्यावर महापालिकेतील अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या वाहनांची संख्या नजरेत भरत होती. महापालिकेतील अधिकारी व प्रतिनिधींना पाहून अनेकांना विभागीय आयुक्तालयात महापालिका दरबार भरला की काय? असा प्रश्‍न पडला. महसूल कर्मचाऱ्यांमध्ये यावर थोडेसे आश्‍चर्य व्यक्त होताना दिसले. 

Web Title: The municipal court in full of the Regional Commission