अडीचशे जणांवरच आरोग्याचा भार

माधव इतबारे
रविवार, 7 जुलै 2019

नुसत्याच घोषणा...
महापालिकेमार्फत सेंट्रल नाका येथे २०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याच्या गेल्या दहा वर्षांपासून नुसत्याच घोषणा सुरू आहेत. मध्यंतरी नामांकित रुग्णालयामार्फत महापालिकेचे मोठे रुग्णालय सुरू करण्याचादेखील निर्णय घेण्यात आला; पण या घोषणा अद्याप हवेतच असून, सर्वसामान्य नागरिकांना मात्र छोट्या-छोट्या आजारांवर उपचार घेण्यासाठी खासगी किंवा शासकीय रुग्णालयांत धाव घ्यावी लागत आहे.

औरंगाबाद - शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागात तब्बल ५८, तर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत ४६ पदे रिक्त आहेत. त्यामुळे १५ लाख लोकसंख्या असलेल्या शहराच्या आरोग्याचा भार केवळ २५७ डॉक्‍टर, नर्स व कर्मचाऱ्यांवर पडला आहे. अडीच लाख लोकसंख्येमागे ५० खाटांचे एक रुग्णालय सुरू करण्याचे केंद्र शासनाचे आदेश असताना त्याकडे महापालिकेने डोळेझाक केली असून, सर्वसामान्यांवर मात्र ऐपत नसताना खासगी रुग्णालयामध्ये महागडे उपचार घेण्याची वेळ आली आहे.

शहरी भागातील आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र शासनाने २०१३ मध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एनयूएचएम) सुरू केले आहे. शहरी भागातील वाढती लोकसंख्या, सर्वसामान्यांना कमी खर्चात उपचार मिळावेत व शासकीय रुग्णालयांवरील वाढता ताण लक्षात घेऊन महापालिकेमार्फत हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येकी ५० हजार नागरिकांच्या मागे एक आरोग्य केंद्र व अडीच लाख लोकसंख्येमागे ५० खाटांचे एक रुग्णालय सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. महापालिकेचे शहरात ३३ आरोग्य केंद्र असले तरी ५० खाटांचे एकही रुग्णालय अद्याप सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), जिल्हा सामान्य रुग्णालयावरील (मिनी घाटी) रुग्णांचा ताण वाढत आहे, तर अनेकांना नाइलाजाने खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. 

१०४ पदे रिक्त 
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अन्न निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मिश्रक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका, लस टोचक, स्टाफ नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, एमपीडब्ल्यू, सांख्यिकी सहायक, लिपिक, समन्वयक अशी १५० पदे मंजूर आहेत; तर सध्या ९२ जण कार्यरत असून, ५८ पदे रिक्त आहेत. तसेच राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत ४६ पदे रिक्त आहेत.

आरोग्य केंद्रांचे रखडले काम 
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत महापालिकेने ४३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करून शासनाला पाठविला होता. त्यात आठ आरोग्य केंद्रांच्या इमारतीच्या बांधकामासाठी निधीही आला; मात्र निविदा प्रक्रियांमध्ये अनेक वर्षे काम रखडले. सध्या गांधीनगर, बायजीपुरा, शिवाजीनगर येथील नव्या इमारतींमध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. चेतनानगर, अल्तमश कॉलनी, गणेश कॉलनी येथील इमारती तयार आहेत; मात्र डॉक्‍टरांअभावी हे आरोग्य केंद्र सुरू झालेले नाहीत. तसेच समतानगर, कबीरनगर येथील इमारतींचे बांधकाम अद्याप सुरूच आहे. 

पाण्याचा अभाव, अनेक ठिकाणी भाड्याच्या इमारती
महापालिकेच्या अनेक आरोग्य केंद्रांना स्वतःच्या इमारती नाहीत. पुंडलिकनगर, जयभवानीनगर येथील आरोग्य केंद्र भाड्याच्या जागेत आहेत; तर अनेक ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. हर्षनगर येथील आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आली असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Health Department Doctor Service