महापालिका आरोग्य अधिकारीपदी डॉ. जयश्री कुलकर्णी कायम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. जयश्री कुलकर्णी यांची पुनर्स्थापना करावी, त्यासाठी एका महिन्यात निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती एस. एस. पाटील यांनी दिले. 

औरंगाबाद - औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. जयश्री कुलकर्णी यांची पुनर्स्थापना करावी, त्यासाठी एका महिन्यात निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती एस. एस. पाटील यांनी दिले. 

डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, महापालिकेने डॉ. कुलकर्णी यांना 2012-13 मध्ये सर्वसाधारण सभेच्या ठरावान्वये आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदावर पदोन्नती नाकारली होती. त्या विरोधात डॉ. कुलकर्णी यांनी शासनाकडे महापालिकेचा ठराव विखंडित करण्यासाठी अपील दाखल केले. हे अपील शासनाने मंजूर केले. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी त्यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती दिली. मात्र त्या काळात डॉ. कुलकर्णी रजेवर असताना, महापालिकेच्या जुन्या ठरावाचा संदर्भ घेऊन आरोग्य विभागाने प्रतिनियुक्तीने डॉ. सुहास जगताप यांची त्यांच्या विनंतीनुसार ता.30 सप्टेंबर 2015 रोजी महापालिकेत बदली केली. तत्कालीन आयुक्तांनीच डॉ.कुलकर्णी यांच्या पदोन्नतीचे आदेश निर्गमित केलेले असताना, त्यांनीच डॉ. सुहास जगताप यांना रुजू करून घेतले. परिणामी महापालिकेत एक पद- दोन अधिकारी, अशी स्थिती निर्माण झाली. या विरोधात डॉ. कुलकर्णी यांनी खंडपीठात धाव घेतली. या गुंतागुंतीच्या परिस्थितीला औरंगाबाद महापालिका जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढून शासन आणि महापालिकेने या संदर्भात योग्य निर्णय घ्यावा, असे निर्देश खंडपीठाने दिले होते. दरम्यानच्या काळात महापालिका आयुक्तांनी ता.20 आणि 29 ऑगस्ट 2016 रोजी डॉ. कुलकर्णी यांना समन्वयक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) तसेच मलेरिया विभागप्रमुख या पदावर पदस्थापना दिली. त्यांच्या नव्या पदाला सर्वसाधारण सभेत मान्यता घेण्याचा प्रयत्न झाल्याने त्यांनी ऍड. बी. एल. सगर किल्लारीकर यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले.

डॉ.सुहास जगताप यांची पदस्थापना बेकायदा असून, आपल्याला मूळ आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदावर पदस्थापना द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. त्यावर झालेल्या सुनावणीत खंडपीठाने डॉ. कुलकर्णी यांना त्यांचा मूळ आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर पुनर्स्थापित करण्याचे आदेश दिले. डॉ. सुहास जगताप यांची या पदावरील प्रतिनियुक्तीने त्यांचा या पदावर हक्क निर्माण होत नाही. त्यांची प्रतिनियुक्ती हा तात्पुरता उपाय होता. डॉ. कुलकर्णी यांच्याविरुद्ध काही आक्षेप असतील तर त्यासाठी कायद्यात पुरेशा तरतुदी आहेत. मात्र त्या संदर्भाने त्यांना पदापासून दूर ठेवता येणार नाही, असेही खंडपीठाने आदेशात म्हटले. दरम्यान, महापालिकेत कार्यरत सोळा कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप अर्ज करून, आपली डॉ. कुलकर्णी यांच्याविरुद्ध तक्रार असल्याचे म्हटले, परंतु खंडपीठाने हा हस्तक्षेप अर्ज फेटाळून लावला. महापालिकेतर्फे ऍड. दिलीप बनकर पाटील तर हस्तक्षेपकांतर्फे ऍड. एस. एस. ठोंबरे यांनी काम पहिले. 

Web Title: The municipal health officer, Dr. Jayshree Kulkarni establishment