लातूरला महापौरांच्या विरोधात स्वकीयांचेच बंड!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

लातूर - लातूर महापालिकेच्या महापौरांनी बुधवारी (ता. 18) आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेकडे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या 39 पैकी 32 नगरसेवकांनी पाठ फिरवत महापौरांविरोधात एक प्रकारे बंड पुकारले. सत्ताधारी नगरसेवकच गैरहजर राहिल्याचे पाहून कॉंग्रेसच्या नगरसेवकांनीही संधी सोडली नाही. त्यांनीही या सभेवर बहिष्कार टाकला.

लातूर - लातूर महापालिकेच्या महापौरांनी बुधवारी (ता. 18) आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेकडे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या 39 पैकी 32 नगरसेवकांनी पाठ फिरवत महापौरांविरोधात एक प्रकारे बंड पुकारले. सत्ताधारी नगरसेवकच गैरहजर राहिल्याचे पाहून कॉंग्रेसच्या नगरसेवकांनीही संधी सोडली नाही. त्यांनीही या सभेवर बहिष्कार टाकला.

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील मतभेद आता चव्हाट्यावर येत आहेत. मंगळवारी (ता. 17) स्थायी समितीची सभा होती. त्या वेळीही सत्ताधारी भाजपचेच नगरसेवक न आल्याने ती रद्द करण्याची वेळ सभापती ऍड. शैलेश गोजमगुंडे यांच्यावर आली. त्यामुळे महापौर सुरेश पवार यांनी बोलावलेल्या आजच्या सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष होते. या सभेला भाजपचेच नगरसेवक गैरहजर राहणार असल्याची चर्चाही कालपासूनच सुरू झाली होती. ती आज खरी ठरली.

येथील डीपीसी हॉलमध्ये दुपारी तीनला सभेला सुरवात झाली. महापालिकेची नवीन इमारत बांधणे, नाट्यगृहाच्या उभारणीबाबत चर्चा, आर्वी व महाराणा प्रतापनगर येथील स्मशानभूमीच्या जागेच्या देखभाल-दुरुस्तीच्या हस्तांतरणास मुदतवाढ देणे, नगरसेवकांचा अभ्यास दौरा, विविध विकास योजनेंतर्गत हाती घेतलेल्या कामांच्या नावात व ठिकाणात बदल करणे आदी विषय पटलावर होते. महापौर सुरेश पवार यांच्यासह स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे, नगरसेवक शैलेश स्वामी, संगीत रंदाळे, ज्योती अवसकर, श्वेता लोंढे, शीतल मालू हे भाजपचे सातच सदस्य उपस्थित होते. महापालिकेत भाजपचे निवडून आलेले 36 व स्वीकृत तीन असे 39 सदस्य आहेत.

यापैकी 32 नगरसेवकांनी या सभेला गैरहजर राहत महापौर पवार यांच्यावर एक प्रकारे बंड पुकारले. त्यांच्या कामावर अविश्वास दाखवला आहे.

कॉंग्रेसनेही साधली संधी
सभेला भाजपचेच नगरसेवक गैरहजर राहिल्याचे पाहून कॉंग्रेसनेही संधी सोडली नाही. त्यांच्या 35 नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच महापौरांनी काही अपरिहार्य कारणामुळे सभा रद्द केल्याचे घोषित केले. सत्ताधारी नगरसेवक गैरहजर राहिल्याने सभा रद्द करण्याची ही महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. या पुढील काळातही आता पक्षातील अंतर्गत मतभेद तीव्रतेने पुढे येण्याची शक्‍यता आहे.

Web Title: municipal mayor oppose politics