महापालिका पदाधिकाऱ्यांचा स्वतःच्या वॉर्डात ‘आदर्श’

माधव इतबारे
सोमवार, 2 जुलै 2018

औरंगाबाद - वॉर्डातील एका-एका विकास कामांची फाईल मंजूर करताना नगरसेवकांचा जीव मेटाकुटीला येत असताना पदाधिकाऱ्यांच्या वॉर्डांत मात्र कोटी-कोटीची उड्डाणे सुरू आहेत. शहरात चार आदर्श रस्ते करण्याची घोषणा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली होती. त्यासाठी आता नगररचना विभागाच्या स्वतंत्र खात्यावर जमा असलेला १५ कोटींचा खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे चार रस्ते फक्त पदाधिकाऱ्यांच्या वॉर्डांतील राहतील याचा बंदोबस्तही करण्यात आला आहे. 

शहरातील ऐतिहासिक कचराकोंडीनंतर विकासकामे ठप्प आहेत. गेल्या चार-पाच महिन्यांत प्रत्येक आयुक्ताने फक्त कचऱ्याला प्राधान्य देत इतर फायलींना बगल दिली. विकासकामांचे अंदाजपत्रक तयार करणे, त्यानंतर निविदा प्रक्रिया, कंत्राटदार शोधणे व वर्कऑर्डर मिळविण्यापर्यंत नगरसेवकांना कसरत करावी लागत आहे. एवढ्या कसरतीनंतर अंतिम टप्प्यात आलेल्या शेकडो फायली सध्या अतिरिक्त आयुक्तांकडे पडून आहेत. आगामी काळात अनेक निवडणुका असून, बहुतांश काळ हा आचारसंहितेत जाणार आहे. त्यामुळे फायली अंतिम करण्यासाठी नगरसेवकांची धडपड सुरू आहे. असे असताना पदाधिकाऱ्यांच्या वॉर्डांत मात्र कोटी-कोटींची विकासकामे सुरू आहेत. एरव्ही विरोधीपक्षांच्या नगरसेवकांना विकासकामांसाठी कमी निधी दिला जातो. 

मात्र, सध्या सत्ताधारी पक्षांचे नगरसेवकदेखील त्रस्त असल्याचे चित्र आहे. त्यात आता चार पदाधिकाऱ्यांनी निधी पळविण्याचा ‘आदर्श’ मार्ग निवडला आहे. महापौरांनी शहरातील चार रस्ते ‘आदर्श रस्ते’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, हे चारही रस्ते फक्त महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृहनेते या पदाधिकाऱ्यांच्या वॉर्डांतील निवडण्यात येत आहेत. या रस्त्यांसाठी नगररचना विभागाच्या स्वतंत्र खात्यात पडून असलेला सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे नगररचना विभागाच्या स्वतंत्र खात्यात असलेल्या पैसा संपूर्ण शहरातील बांधकाम परवाने, विकास शुल्कापोटी जमा झालेला आहे.

आदर्श रस्त्यासाठी रस्त्यांची नावे अंतिम करण्यासाठी प्रशासनाला आदेशित करण्यात आले आहे. विकास आराखड्यातील रस्त्यांचा यात समावेश असेल. 
- नंदकुमार घोडेले, महापौर. 

Web Title: municipal officer ward development