महापालिकेच्या शाळेचा स्वतःच्या मालमत्तेप्रमाणे वापर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

औरंगाबाद - महापालिकेची एन ६ येथील शाळा भाडेकरारावर देण्यात आली; मात्र भाडेकरारावर घेणारे शाळेचा स्वत:च्या मालमत्तेप्रमाणे वापर करीत आहेत. परिसरातील मुले, नागरिकांना मैदानावरही येऊ देत नसल्याचे नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत निदर्शनास आणून दिले. तसेच यापुढे कराराच्या नावावर महापालिकेच्या शाळा धनदांडग्यांच्या घशात घालू नका, अशी मागणीही केली. त्यावर सभापती गजानन बारवाल यांनी शाळेची पाहणी करण्याचा आणि कराराचा भंग झाला असेल तर योग्य ती कारवाई करण्याचा आदेश दिला. 

महापालिकेच्या शुक्रवारी (ता. २७) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सिडको एन ६ येथील शाळेचा मुद्दा चर्चेला आला. ही शाळा साई सोल्युशनला देण्यात आली असून, ही महापालिकेचे निवृत्त शहर अभियंता एम. डी. सोनवणे चालवत असल्याचे सदस्यांनी सांगितले. शाळा करारावर देताना शाळेच्या स्ट्रक्‍चरमध्ये कोणताही बदल करता येणार नाही, असे नमूद केले आहे; मात्र संबंधितांनी या शाळेचे गेट तोडले आहे. तिथेच स्वत:चे कार्यालय थाटले आहे. परिसरातील मुलांना या शाळेच्या मैदानावर खेळू दिले जात नाही. भाडेतत्त्वावर घेतलेल्या शाळेचा मालकीसारखा वापर होत असेल, कराराचा भंग केला असेल तर करार रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. या चर्चेत राजगौरव वानखेडे, राजू वैद्य यांनी भाग घेतला. चर्चेनंतर सभापतींनी वरीलप्रमाणे आदेश दिले.

सीएसआरमधून एन ७ मधील शाळा होणार नवीन
सिडको एन ७ येथील महापालिकेच्या शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. यासाठी फोर्ब्स कंपनी सीएसआरमधून शाळेच्या इमारतीचे काम टप्प्या-टप्प्याने तीन वर्षांत बांधून देण्यास तयार आहे. यावर ४० ते ५० लाख रुपये खर्च होणार असून, संपूर्ण खर्च संबंधित कंपनी करणार आहे. यासाठी सध्याची इमारत महापालिकेने पाडून जागा रिकमी करून देण्याबाबतचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. 

Web Title: municipal school self property use crime