महापालिका शाळांच्या "गुणवत्ते'पुढे आयुक्तांनी टेकले हात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - महापालिकेच्या शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कौटुंबिक आर्थिक स्थिती बेताचीच असते यामुळे ते अभ्यासात हुशार असूनदेखील खासगी शिकवणी लावू शकत नाहीत. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या हुशार विद्यार्थ्यांना शहरातील चांगल्या खासगी शिकवणी लावण्यासाठीचा खर्च महापालिका उचलणार आहे. यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले. 

आयुक्‍तांनी सोमवारी (ता. 20) साप्ताहिक बैठकीत सर्व विभागांचा आढावा घेताना विभागप्रमुखांच्या बैठकीत हे आदेश दिले. महापालिकेच्या शाळांमधील इयत्ता 8 वी ते 10 वीतील हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना चांगल्या खासगी शिकवणीतून मार्गदर्शन मिळावे यासाठी महापालिकेतर्फे शिकवणी खर्च उचलण्यात येणार आहे. सीएसआर फंडातून हा खर्च करण्याचा प्रयत्न केला जाणार असून जर सीएसआर फंडातून निधी उपलब्ध झाला नाही तर महापालिका स्वत:च्या फंडातून शिकवणीचे शुल्क भरणार आहे. सीएसआर फंडासाठी प्रायोजकांचा शोध घेण्याचे संबंधितांना सांगण्यात आले असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिकेच्या सर्व शाळांना स्टोअर रूम, कॉम्प्युटर लॅब तयार करण्याच्या; तसेच महापालिकेतर्फे रात्रशाळा सुरू करणे, स्पोकन इंग्लिश वर्ग सुरू करणे, भावसिंगपुरा येथे सिटी सर्व्हे क्रमांक 32 येथे क्रीडा शाळा सुरू करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. सर्व शाळांच्या वर्गखोल्यांना रंगरंगोटी करण्याचे; तसेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत महापालिकेच्या शाळेतील अधिकाधिक विद्यार्थी सहभागी होण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसण्याच्या सूचना दिल्या. 

वार्षिक अंदाजपत्रकात दिव्यांगांकडे लक्ष 
आगामी वार्षिक अंदाजपत्रकात दिव्यांग व्यक्‍तींकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष राहणार असल्याचे आयुक्‍तांनी संकेत आढावा बैठकीत दिले आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी उद्यान तयार तयार करणे, दिव्यांगांना विविध प्रशिक्षण देणे व त्यांच्यासाठी स्वतंत्र क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला; तसेच आगामी वार्षिक अंदाजपत्रकात दिव्यांगांसाठी आर्थिक तरतूद करण्याच्या सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Municipal schools