भाजपमध्येच दुफळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जून 2019

कोण घेणार माघार?
अधिकृत उमेदवार कोण याची माहिती येण्याआधीच भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी आमच्या सह्या घेतल्या. मात्र, आम्ही भाजपच्या अधिकृत उमेदवारासोबत आहोत, असे सदस्य गजानन बारवाल यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी चार जूनलाच मतदानापूर्वी अर्धा तास आधी वेळ दिला जाणार आहे. त्याच वेळी उमेदवारी अर्ज कोण मागे घेतो, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. श्री. शिंदे यांच्या बाजूने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे असल्याचे सांगितले जात आहे. श्रीमती कुलकर्णी यांचे पती सुरेंद्र कुलकर्णी यांनी तनवाणी यांच्यासोबत शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे तनवाणी यांनी कुलकर्णी यांना पद मिळावे, यासाठी फिल्डिंग लावली आहे.

औरंगाबाद - महापालिकेतील स्थायी समिती सभापतिपदासाठी शिवसेनेने अर्ज घेऊन भाजपचे टेन्शन वाढविले होते. मात्र, शनिवारी (ता. एक) शिवसेनेतर्फे अर्ज भरण्यात आला नाही. असे असताना दुसरीकडे भाजपमध्ये मात्र दुफळी निर्माण झाल्याचे चित्र आहे. भाजपच्या गटनेत्यांनी सकाळी युतीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन राजू शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला, तर तासाभरातच जयश्री कुलकर्णी यांनीही अर्ज दाखल केला. दरम्यान, भाजपच्या अधिकृत उमेदवार जयश्री कुलकर्णी असल्याचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी जाहीर केले आहे. 

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी मंगळवारी (ता. चार) निवडणूक होत आहे. युतीतील करारानुसार सभापतिपद भाजपकडे आहे. मात्र, शुक्रवारी (ता. ३१) शिवसेनेने अर्ज घेऊन भाजपच्या गोटात धडकी भरविली होती. दरम्यान, शनिवारी अर्ज मात्र शिवसेनेने भरला नाही. त्यामुळे भाजपचा सभापतिपदाचा मार्ग मोकळा झाला असे मानले जात असतानाच भाजपमधील दुफळी समोर आली. गटनेते प्रमोद राठोड यांनी सकाळी राजू शिंदे यांचा अर्ज दाखल केला. 

या वेळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेता विकास जैन, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राजेंद्र जंजाळ यांची उपस्थिती होती. त्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी निरोप देत जयश्री कुलकर्णी या भाजपच्या उमेदवार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर श्रीमती कुलकर्णी यांनी महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, गजानन बारवाल यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदे यांच्या दोन अर्जांवर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ आणि भाजपचे पूनम बमणे व गजानन बारवाल यांची सूचक-अनुमोदक म्हणून नावे आहेत. कुलकर्णी यांच्या अर्जावर शिवसेनेचे कमलाकर जगताप, सीमा चक्रनारायण, शिल्पाराणी वाडकर आणि सचिन खैरे हे सूचक अनुमोदक आहेत. तासाभराच्या अंतराने भाजपच्या दोन सदस्यांनी अर्ज दाखल केल्यामुळे भाजपमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Standing Committee Selection BJP Shivsena Politics