निविदा काढली; पण खरेदी काय करायचे?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

औरंगाबाद - खेळाला चालना देण्यासाठी महापालिकेने तब्ब्ल ४० लाखांचे क्रीडा साहित्य खरेदीची निविदा काढली; पण ऑनलाइन झळकलेल्या निविदेत नेमके साहित्य काय खरेदी करायचे याची यादीच गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

औरंगाबाद - खेळाला चालना देण्यासाठी महापालिकेने तब्ब्ल ४० लाखांचे क्रीडा साहित्य खरेदीची निविदा काढली; पण ऑनलाइन झळकलेल्या निविदेत नेमके साहित्य काय खरेदी करायचे याची यादीच गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

महापालिकेच्या क्रीडा विभागातर्फे शहरातील मुलांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी क्रीडा साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी तब्बल चाळीस लाखांचा निधीही राखीव ठेवण्यात आला. या रकमेतून काय खरेदी करायचे यावर चर्चा झाली आणि त्याची यादी आपण टेंडरिंग विभागाला दिल्याचे क्रीडा विभागातर्फे सांगण्यात येत आहे. असे असताना ऑनलाइन झळकलेल्या निविदेतून क्रीडा साहित्य खरेदीची यादीच गायब आहे. त्यामुळे या रकमेचा खर्च नेमका कशावर आणि किती करायचा याचा अंदाज जनतेला आणि या निविदा भरणाऱ्यांनाही येत नसल्याचे चित्र आहे.

ही निविदा काढण्याची महापालिकेची ही चौथी वेळ असल्याची माहितीही समोर आली आहे. तीन वेळा निविदा काढल्यावर ती भरण्यासाठी समोर आलेल्यांची कागदपत्रे व्यवस्थित नसल्याचे सांगत त्या फेटाळण्यात आल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. चौथ्यांदा एक निविदा प्रसिद्ध होते आणि त्यात असा सावळा गोंधळ नेमका कोणासाठी, महापालिकेला ही रक्‍कम खर्च करायची नाही का, असे सवाल क्रीडा वर्तुळात विचारले जात आहेत. 

अनेक प्रश्‍न अनुत्तरित
शहरात अनेक ठिकाणी विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. महापालिकेला खरेदी करायचे असलेले साहित्य नेमके कोणाच्या वापरासाठी आहे. महापालिकेच्या शाळेत ते वापरले जातील की प्रशिक्षण संस्थांकडे ती सुपूर्द केली जातील याची कोणतीही माहिती या निविदेत नाही. क्रीडा साहित्य खरेदीच्या नावाखाली बगिचातील खेळणी घेणार की अजून काही, असे अनेक प्रश्‍न या अर्धवट निविदेमुळे अनुत्तरित राहतात.

Web Title: municipal tender purchasing