‘लाज वाटतेय, बोंबलून थकलोय...’

Aurangabad-Municipal
Aurangabad-Municipal

औरंगाबाद - बंद पथदिवे, दूषित पाण्याच्या समस्या, ड्रेनेजलाइनच्या दुरुस्ती अशा छोट्या-छोट्या कामांसाठीही फायलींचा प्रवास वर्ष-वर्ष सुरू असल्याने ‘आता विषय मांडण्याची लाज वाटतेय,’ ‘बोंबलून थकलोय...’ अशा शब्दांत नगरसेवकांनी बुधवारी (ता. सहा) सर्वसाधारण सभेत संताप व्यक्त केला.

सभेला सुरवात होताच शिवसेनेचे नगरसेवक सीताराम सुरे यांनी वॉर्डातील दूषित पाण्याचा विषय उपस्थित केला. दोन नगरसेवकांनी राजीनामा दिला, एकाने उपोषण केले. त्यांच्या वॉर्डात विकासकामे सुरू झाली. मग आम्ही देखील राजीनामे द्यायचे का? असा प्रश्‍न त्यांनी केला. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, विद्युत विभागाचे उपअभियंता शेख खमर यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचे समाधान झाले नाही. एमआयएमचे फेरोज खान, अब्दुल नाईकवाडी यांच्यासह इतर नगरसेवकही आपल्या वॉर्डातील अडचणी सांगत असल्याने गोंधळ निर्माण झाला. 

माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी अशाने समस्या सुटणार नाहीत. एका-एका विषयावर चर्चा घेण्याची मागणी केली. त्यानंतर मनीषा मुंडे यांनी जयभावानीनरातील नाल्याचे काम चार वर्षांत पूर्ण झाले नाही. आता हा विषय मांडताना मला लाज वाटतेय. सोमवारी काम सुरू करू, असे आश्‍वासन आयुक्तांनी दिले. किती सोमवार गेले सांगा, असा प्रश्‍न त्यांनी आयुक्तांना केला. त्यावर पुन्हा एकदा त्यांना सोमवारचे आश्‍वासन देण्यात आले. अब्दुल नाईकवाडी यांनी वॉर्डातील दूषित पाण्याच्या विषयावर बोंबलून थकलोय; मात्र काम होत नाही, अशा भावना व्यक्तकेल्या. गंगाधर ढगे, जफर शेख, अब्दूल अजीम, काँग्रेसचे भाऊसाहेब जगताप यांनी कामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्‍त केली. आत्माराम पवार म्हणाले, सभागृहात चर्चा होतेय, पण काम कोण करणार? सुरेखा सानप यांनी उत्तरानगरीतील पाण्याचे लाईन तेरा वेळा टेंडर झाले, पण काम होत नाही, ही बाब निदर्शनास आणून दिली. अदवंत यांनी गुरुसहानीनगर भागाचा पाणीप्रश्‍न सोडविला जात नसेल तर आमच्याकडून करही वसूल करु नका, असे सुनावले.

सत्ताधाऱ्यांची ही गत, आमचे काय? 
एमआयएमचे फेरोज खान, नासेर सिद्धिकी यांनी सत्ताधारी नगरसेवकांचीच कामे होत नसतील तर आमचे काय? असा प्रश्‍न महापौरांना केला. त्यावर सर्वांचे प्रश्‍न सोडविण्यात येतील, त्यासाठीच सर्वसाधारण सभा आहे, असे उत्तर दिले. सुरे यांनी माजी महापौर त्र्यंबक तुपे यांना महापौर, चेअरमन अशी पदे भोगल्यानंतरही एवढे बोलावे लागते, असा टोला मारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com