पाचही आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

लातूर - येथील ‘स्टेप बाय स्टेप क्‍लासेस’चे चालक अविनाश चव्हाण यांचा गोळी झाडून खून केल्याप्रकरणी पाचही आरोपींच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने ता. सात जुलैपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, या प्रकरणात केज येथून अटक करण्यात आलेल्या रमेश मुंडे याच्या घरातून पोलिसांनी आणखी एक पिस्तूल जप्त केले आहे.

अविनाश चव्हाण यांचा ता. २५ जूनला मध्यरात्री गोळी झाडून खून झाला होता. चव्हाण यांचा एकेकाळचा भागीदार प्रा. चंदनकुमार शर्मासह महेंद्रचंद्र बोगडे, शरद घुमे, करण गहिरवार, अक्षय शेंडगे यांना २६ जूनला अटक केली होती. आर्थिक कारणावरून हा खून झाला होता. यात करणने वीस लाखांची सुपारी घेऊन चव्हाण यांच्यावर गोळी झाडल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले होते.

करणकडून पोलिसांनी एक पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त केली होती. या पाचही जणांची पोलिस कोठडीची मुदत आज संपली. त्यांना पुन्हा न्यायालयासमोर उभे करण्यात आले. कोठडीची मुदत वाढवून देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. त्यानुसार या सर्वांना ता. सात जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

दरम्यान, करणला पिस्तूलचा पुरवठा करणारा रमेश मुंडे याला पोलिसांनी अटक केली होती. त्यालाही न्यायालयाने सात जुलैपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. मुंडे याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यानंतर केज येथून त्याच्या घरातून आणखी एक पिस्तूल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली.

Web Title: murder case accused police custody crime