इम्रानचे ‘सुपारी’ नेटवर्क होते ‘स्ट्राँग’!

इम्रान मेहंदी
इम्रान मेहंदी

औरंगाबाद - शिक्षा सुनावल्यानंतर इम्रान मेहंदी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मार्च २०१२ मध्ये अटक झाल्यानंतर त्याने सुपारी घेऊन केलेल्या खुनांची मालिकाच उघड झाली होती. त्या वेळी हा इम्रान मेहंदी कोण, हीच चर्चा शहरात होती. मुंबईत गॅंगवारचे ‘धडे’ घेतलेल्या इम्रान मेहंदीने काही तरुणांना सोबत घेऊन शहरातील ‘सुपारी’ नेटवर्क ‘स्ट्राँग’ केले होते. शांत डोक्‍याचा; पण खुनशी स्वभावाचा इम्रान काय चीज आहे, हे पोलिसांना त्याला अटक केल्यानंतर कळाले. ‘मेहंदी’ हा शहरात आल्यानंतर त्याचा खरा धंदा हा ‘सुपारी’चा होता, हे पोलिसांना समजले; पण तोपर्यंत पाच मुडदे पडले होते.

अनेक तरुण अडकले
खुनांचा उलगडा होण्यापूर्वी इम्रान मेहंदी हा पडेगावच्या डोंगराजवळील फार्म हाऊस; तसेच कटकटगेट येथील सर्व्हिसिंग सेंटरजवळ बसायचा.

यादरम्यानच्या काळात त्याची अनेक तरुणांशी ओळख झाली होती. विशेष म्हणजे, आसेफिया कॉलनीत त्याचे वास्तव्य असल्याने अनेक तरुण त्याला ओळखत होते; मात्र इम्रानच्या संपर्कात आल्याने कित्येक तरुण हे त्याच्या गुन्हेगारी कारवायांत अडकले. पोलिसांनी २०१२ मध्ये अटक केलेल्या इम्रानच्या सर्वच साथीदारांचे वय २० ते ३० वर्षांचे होते. त्यातूनच इम्रानचे ‘कॉन्ट्रॅक्‍ट किलिंग’ वाढत होते.

कुरैशी खुनानंतर ‘सुपारीकांड’
इम्रान मेहंदी याने कुरैशी यांचा खून करून, त्यांचा मृतदेह पडेगाव परिसरातील जमिनीत पुरला होता, पोलिसांनी ११ मार्चला कुरैशी यांचा जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला होता.  यानंतर सिंधूबाई म्हात्रे (वय ३५) आणि त्यांचा मुलगा नीलेश म्हात्रे (२६) यांची इम्रान मेहंदीने तीन लाखांमध्ये सुपारी घेतल्याचे तपासातून समोर आले होते. इम्रानने एप्रिल २०११ मध्ये नीलेश म्हात्रे याला गायब करून त्याचा चाळीसगाव येथे नेऊन खून केला होता. नीलेश गायब झाल्यापासून पत्नी सिंधूबाई म्हात्रे सारखी सुपारी देण्याचा आरोप असलेल्या पती गजानन म्हात्रेच्या मागे लागली होती. यानंतर पत्नीचा काटा काढण्यासाठी सिंधूबाई यांना गुंगीचे औषध देऊन गुरुगणेशनगर येथील घरातून उचलून नेऊन गळा दाबून खून करण्यात आला होता. इम्रानला अटक झाल्यानंतर सिंधूबाई यांचा मृतदेह पोलिसांनी सावंगी शिवारातील एका फार्म हाऊसच्या जागेतून उकरून काढला होता; तसेच इम्रानचा साथीदार असलेल्या शेख नासेरचा मृतदेह तुळजापूर, तर प्लॉटिंग व्यावसायिक सिराजउद्दीन यांचा मृतदेह भावसिंगपुरा भागातून पोलिसांनी उकरून काढला होता. 

इम्रानच्या धमक्‍यांनी भरायची धडकी
‘मी मुंबईच्या गॅंगवारमध्ये काम केले आहे. कोणी माझे वाकडे करू शकत नाही.’ ‘माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक झाली तरी मी ‘लॉकअप’मधूनही काम करू शकतो. जेलमध्ये गेलो तर तेथूनही मी सूत्रे चालवू शकतो’, ‘तुला एखाद्या वाहनाखाली मारून टाकेन व ॲक्‍सिडेंट केसमध्ये काहीही होऊ शकत नाही. मला सारे कायदे माहिती आहेत,’ अशा धमक्‍या तो लोकांना देत होता. त्याच्या धमक्‍यांनी अनेकांना धडकी भरत होती. पडेगाव, मिटमिटा भागातील लोकांनी त्याच्याविरुद्ध त्या वेळी प्लॉट प्रकरणे; तसेच धमक्‍यांच्या लेखी तक्रारी दिल्या होत्या.

शांत डोक्‍याने ‘कॉन्ट्रॅक्‍ट किलिंग’
उघड झालेल्या पाच गुन्ह्यांत त्याने शांत डोक्‍याने खून केले. इतकेच नव्हे, तर त्याने आपल्या साथीदारालासुद्धा सोडले नाही. पोलिसांना पुरावे मिळूच नये, यासाठी त्याने खुनानंतर मृतदेह पुरले. सुपारी मिळाल्यानंतर समोरच्याला उचलून वाहनात बसवायचे आणि नंतर एखाद्या निर्जन ठिकाणी नेऊन गळा आवळायचा किंवा गळ्यावर चाकूने वार करून मृतदेह पुरून टाकायचा ही त्याची पद्धत पोलिसांच्या तपासात समोर आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com