संतप्त कार्यकर्त्यांचा ठाण्यासमोर ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

औरंगाबाद - शहरात उसळलेल्या दंगलीत खूनप्रकरणी सहाजणांना अटक झाली. न्यायालयाने त्यांना जामीनही दिला. पण सुटण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना दंगलीतील आणखी एका गुन्ह्यात अटक केली. याविरोधात रोष उफाळून आमदार इम्तियाज जलील व समर्थकांचा मोठा जमाव सिटी चौक पोलिस ठाण्यासमोर मंगळवारी (ता. २६) दुपारी दीडनंतर जमला. संशयितांना सोडण्याची मागणी व पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी करून त्यांनी ठाण्यासमोर ठिय्या मांडला. यामुळे तणाव होऊन बाजारपेठही बंद झाली.

औरंगाबादेत अकरा व बारा मे रोजी शहरात घडलेल्या दंगलीत जगनलाल बन्सीले यांच्या खुनाच्या आरोपाखाली शेख मोहम्मद नियाज ऊर्फ सिकंदर शेख मोहम्मद नजीर (वय २५), शेख अरबाज शेख अयूब (वय २०), शेख सत्तार ऊर्फ सलमान शेख सलीम, शेख सोहेल शेख रियाज, शेख आमेर शेख पाशा, शेख वसीम शेख हसनोद्दीन या संशयितांना अटक झाली होती. त्या गुन्ह्यात चाळीस दिवसांपासून कारागृहात होते. दंगलीदरम्यान पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी या संशयितांना सोमवारी (ता. २५) पोलिसांनी जालन्याच्या कारागृहातून औरंगाबादेत हस्तांतरित करून मंगळवारी (ता. २६) खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुन्हा अटक केली. याविरुद्ध एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, असंख्य समर्थकांसह सिटी चौक ठाण्यासमोर जमले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत संशयितांच्या सुटकेची मागणी केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, मोठा जमाव जमल्यानंतर पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद सिटी चौक ठाण्यात आले व त्यांनी इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ठिय्या थांबविण्यात आला. त्यानंतर संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

पोलिस अन्यायकारक कारवाई करीत असल्याचा आरोप चुकीचा आहे. गुन्ह्यांशी संबंधित व्यक्तींविरुद्धच कारवाई होत आहे. कायदेशीर बाबी तपासून कार्यवाही करीत आहोत. 
- चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त.

Web Title: murder case riot crime agitation tension