मुलीऐवजी मुलगा झाल्याने आईनेच केला मुलाचा खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

चितेगाव - मुलगी नको म्हणून तिचा आईने खून केल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत; पण मुलगा नको म्हणून त्याचा आईनेच खून केल्याची घटना पैठणखेडा (ता. पैठण) येथे घडली. ड्रममध्ये दहा महिन्यांच्या बालकाचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात आईनेच अशी कबुली दिली आहे.

चितेगाव - मुलगी नको म्हणून तिचा आईने खून केल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत; पण मुलगा नको म्हणून त्याचा आईनेच खून केल्याची घटना पैठणखेडा (ता. पैठण) येथे घडली. ड्रममध्ये दहा महिन्यांच्या बालकाचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात आईनेच अशी कबुली दिली आहे.

पैठणखेडा येथील लिंबादास खैरे यांची मुलगी वेदिका हिचा विवाह पिंपरखेडा (ता. गंगापूर) येथील परमेश्‍वर एरंडे यांच्याशी झाला होता. त्यांना एक मोठा मुलगा असून, प्रेम हा दहा महिन्यांचा धाकटा मुलगा आहे. वेदिका दोन मुलांसह शनिवारी (ता. २३) पैठणखेडा येथे माहेरी आली होती. आपल्या मुलांना जवळ घेऊन झोपली असता रात्री एकच्या सुमारास तिला जाग आली तेव्हा प्रेम हा बेपत्ता होता. कुणीतरी मुलगा पळवून नेल्याची फिर्याद वेदिकाने शनिवारी रात्रीच बिडकीन पोलिस ठाण्यात दिली. फौजदार विठ्ठल आईटवार यांनी रविवारी (ता. २४) सकाळी तपास सुरू केला तेव्हा अंगणातील पाण्याच्या ड्रममध्ये मुलगा मृतावस्थेत आढळला. माहिती घेतली असता प्रकरणाचा उलगडा झाला. आठ दिवसांपूर्वी प्रेम घरात झोपलेला होता व आई वेदिका ही घरी एकटीच असताना ती थोड्या वेळाकरिता बाहेर गेली होती. घरी परतल्यावर मुलगा घरातील टपामध्ये पडलेला दिसला. त्यावेळी तो वाचला, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे वेदिकावरील संशय वाढला. कसून चौकशी केली असता मुलाचा खून केल्याची कबुली वेदिकाने दिली. तिने सांगितले, ‘मला पहिला मुलगा होता. दुसरी मुलगी हवी होती; पण मुलगाच झाला. त्यामुळे प्रेम मला आवडत नव्हता. शिवाय दोन्ही मुलांचा सांभाळ करणेही शक्‍य नव्हते. म्हणून मीच त्याचा पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून खून केला. आठ दिवसांपूर्वीही त्याला टपमध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता.’

बालकाचा अंत झालेला असताना आईच्या डोळ्यांना पाणी नव्हते. आठ दिवसांपूर्वी मुलगा पाण्याच्या टपमध्ये पडलेला होता. तरीही ती गंभीर दिसली नाही. त्यामुळे तिच्यावर संशय बळावल्यामुळे चौकशी केली असता या प्रकरणाचा उलगडा झाला. 
- पंडित सोनवणे (सहायक पोलिस निरीक्षक)

Web Title: murder crime