व्यापाऱ्याचा केला कैचीने खून

Murder
Murder

औरंगाबाद - रहेमानिया कॉलनीत किरायादारांना त्रास देणाऱ्या अल्पवयीन मुलाला समजावण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्यावर कैचीने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी (ता. १२) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. समद खान अहेमद खान (वय ४०, रा. कैसर कॉलनी) असे मृताचे नाव आहे.

समद खान यांचे किराडपुऱ्यात दुकान असून त्यांच्या मालकीची रहेमानिया कॉलनीत इमारत आहे. ती त्यांनी भाड्याने दिली आहे. त्या भाडेकरूंना परिसरातील अल्पवयीन मुलगा त्रास देतो, असे त्यांना कळले होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलाची समजूत काढली होती. समद खान शनिवारी पाचच्या सुमारास तेथे आले होते. त्यावेळी त्या अल्पवयीन मुलांकडून त्रास सुरूच असल्याचे भाडेकरूंनी त्यांना सांगितले. तसेच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ही मुले गांजा पीत बसतात, त्याचा महिलांना त्रास होत असल्याचेही त्यांनी समद खान यांना सांगितले होते.  समद खान यांनी मुलाला भेटून ‘तू भाडेकरूंना का त्रास देतो,’ असा जाब विचारला. त्यावेळी त्या मुलाने उलट जाब दिल्याने संतापलेल्या समद यांनी त्याला मारहाण केली. तो घाबरून निघून जाईल, असा त्यांचा समज होता. मात्र, त्या मुलाने समोरच असलेल्या टेलरच्या दुकानातून कैची उचलून समद खान यांच्यावर कैचीने हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी त्यांना घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिस दाखल झाले, स्थानिक नागरिकांनीही घाटी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, अपघात विभागासमोर गर्दी झाल्यामुळे तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळताच बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक राजश्री आडे घाटीत पोचल्या. तसेच पोलिस मुख्यालयातून अतिरिक्त फौजफाटा आणि स्ट्रायकिंग फोर्सला पाचरण करण्यात आले होते.

शोधासाठी तीन पथके
मृताच्या नातेवाइकांनी या भागात राहणारे सलीम पटेल यांच्या मुलाने खून केल्याचा आरोप केला. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर रहेमानिया कॉलनी भागात खुनाची माहिती मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आली आहेत. आरोपीच्या वडिलांना आणि भावाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. खून करणारे हे अमली पदार्थांची नशा करतात, त्यांच्याविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com