नर्सच्या पतीचा विहिरीत ढकलून खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

तीन तासांत दाखवतो 
सावरगाव (जि. जालना) येथे चला तीन तासांत विजय कुठे आहे ते दाखवतो, असे गवळीने पुष्पा सुर्वे यांना सांगितले. त्यामुळे गवळीवर संशय बळावला होता. याचदरम्यान मौजेपुरी ठाण्यातून पुष्पा यांच्या भावाला विजय यांच्याबाबत फोन आला. त्यांनी खात्री केल्यानंतर विहिरीतील मृतदेह विजय यांचा असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी मनोज गवळीविरुद्ध जालना जिल्ह्यातील मौजपुरी ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर जवाहरनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

औरंगाबाद - नऊ एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेच्या पतीचा शोध लागला असून, त्याचा विहिरीत ढकलून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली. आर्थिक वाद असल्याने एकाने त्याला सोबत नेत विहिरीत ढकलून दिल्याचा प्रकार शनिवारी (ता. २०) उघडकीस आला.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, विजय देविदास सुर्वे (वय ४१, रा. शंभूनगर) असे मृताचे नाव आहे. त्यांची पत्नी पुष्पा या हेडगेवार रुग्णालयात परिचारिका आहेत. त्यांना एक मुलगा, मुलगी असून, ते गारखेड्यातील शंभूनगर येथे राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नऊ एप्रिलला त्या कामावरून घरी आल्या. त्यावेळी मनोज शहादेव गवळी (रा. इंदिरानगर) याने हट्ट करून सुर्वे यांना दुचाकीने घराबाहेर नेले. तेव्हापासून सुर्वे बेपत्ता होते. याबाबत त्यांच्या पत्नीने जवाहरनगर पोलिस ठाण्यात पती बेपत्ता असल्याबाबत तक्रार दिली.

यादरम्यान १२ एप्रिलला गवळी दोनवेळा सुर्वे यांच्या घरी गेला. त्याने सुर्वेबाबत पत्नीला विचारणा केली. त्यामुळे गवळीवर सुर्वे कुटुंबीयांचा संशय बळावला. विशेषत गवळी किरायाने राहतो. किरायाच्या पैशांबाबत सुर्वे यांनी त्याच्या घरमालकासोबत तडजोड करून दिली होती. २८ मार्चला सकाळी सुर्वे यांचा घरामागे राहणाऱ्या महिलेसोबत ड्रेनेजवरून वादही झाला होता. तेव्हा सुर्वे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, असेही तक्रारीत नमूद आहे.

Web Title: Murder Crime