एकेकाळचा भागीदारच खूनाचा मास्टरमाइंड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

वीस लाखांची सुपारी देऊन अविनाश चव्‍हाणांचा खून, पाच अटकेत
लातूर - येथील ‘स्टेप बाय स्टेप क्‍लासेस’चे संचालक अविनाश चव्हाण यांच्या खून प्रकरणाचा तपास उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. चव्हाण यांचा एकेकाळचा भागीदार (पार्टनर) प्रा. चंदनकुमार शर्मा हा या प्रकरणाचा मास्टरमाइंड असून २० लाखांची सुपारी देऊन त्याने हा खून घडवून आणला आहे. प्रा. चंदनकुमार शर्मा याच्यासह पाचजणांना अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी मंगळवारी (ता. २६) येथे पत्रकार परिषदेत दिली.

वीस लाखांची सुपारी देऊन अविनाश चव्‍हाणांचा खून, पाच अटकेत
लातूर - येथील ‘स्टेप बाय स्टेप क्‍लासेस’चे संचालक अविनाश चव्हाण यांच्या खून प्रकरणाचा तपास उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. चव्हाण यांचा एकेकाळचा भागीदार (पार्टनर) प्रा. चंदनकुमार शर्मा हा या प्रकरणाचा मास्टरमाइंड असून २० लाखांची सुपारी देऊन त्याने हा खून घडवून आणला आहे. प्रा. चंदनकुमार शर्मा याच्यासह पाचजणांना अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी मंगळवारी (ता. २६) येथे पत्रकार परिषदेत दिली.

चव्हाण यांचा रविवारी (ता. २४) मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास गोळी झाडून खून झाला होता. डॉ. राठोड यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून मास्टरमाइंड ‘कुमार मॅथस्‌ क्‍लासेस’चा प्रमुख प्रा. चंदनकुमार शर्मा याच्यासह पाचजणांना अटक केली आहे. 

प्रा. चंदनकुमार छोटेलाल शर्मा हा मूळचा हरियानाचा असून सध्या येथील तुळशीधाम अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहे. तो ‘बी.ई. मॅकेनिकल’ असून काही वर्षांपूर्वी त्याने येथे अकरावी-बारावीसाठी मॅथस्‌चा क्‍लास सुरू केला. क्‍लास चालेनासा झाल्यामुळे २०१५ मध्ये त्याच्यावर गाशा गुंडाळण्याची वेळ आली होती. त्याच वेळी त्याची अविनाश चव्हाण यांच्याशी ओळख झाली. चव्हाण यांनी भागीदारीत त्याला सहकार्य केले. त्यानंतर पुन्हा सुरू केलेल्या क्‍लाससाठी पहिल्याच वर्षी शंभर विद्यार्थी मिळाले. पुढे क्‍लासने भरारी घेतली. चव्हाण यांनी काही वर्षांपूर्वी ‘स्टेप बाय स्टेप’ नावाने स्वतःचा क्‍लास सुरू केला. तरीही दोघांचे आर्थिक व्यवहार सुरू होते. यातून त्यांचे वादही सुरू झाले. काही दिवसांपूर्वी चव्हाण हा आपल्याला मारणार असल्याची माहिती प्रा. चंदनकुमारला मिळाली. त्यामुळे चव्हाणलाच मारण्याची योजना आखली गेल्याचे समोर येत असल्याचे डॉ. राठोड म्हणाले.

असा शिजला कट...
प्रा. चंदनकुमारने त्याचा आर्थिक बाबी सांभाळणारा मित्र महेशचंद्र प्रभाकर बोगाडे ऊर्फ रेड्डी (पाटील) याला योजना सांगितली. बोगाडे याने हालकी (ता. शिरूर अनंतपाळ) येथील शरद घुमे याच्याशी संपर्क साधला. शरदने पुढे गावातीलच करण गहिरवार याच्याशी संपर्क साधला. शरद व करण यांच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा नोंद आहे. हे दोघे चार जूनला बोगाडेकडे आले. तेथे खुनाचा कट शिजला. अविनाश चव्हाण यांना मारण्यासाठी वीस लाखांची सुपारी देण्यात आली. त्यातील साडेआठ लाख करण गहिरवारला लगेचच देण्यात आले. आठ दिवसांत करणने बिहारमधून दीड लाखाचे रिव्हॉल्व्हर, काडतुसे परळी येथे मागवून घेतली. आंबा कारखान्याच्या परिसरात त्याने त्याची चाचणीही घेतली होती, असे डॉ. राठोड म्हणाले. ता. १०, १३ जूनला चव्हाण यांच्यावर पाळत ठेवून करणने रेकी केली. त्यावेळी त्याला मोबाईल कॉल आल्यास चव्हाण हे कार रस्त्याच्या कडेला घेत असत, हे लक्षात आले.

घटनेच्या दिवशी करणने अक्षय शेंडगेला सोबत घेऊन दुचाकीवरून चव्हाण यांचा पाठलाग केला. कार थांबल्यानंतर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या करणने चव्हाण यांच्यावर गोळी झाडली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात मास्टर माईंड प्रा. चंदनकुमार, महेंद्रचंद्र बोगाडे, शरद घुमे, करण गहिरवार, अक्षय शेंडगे यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे डॉ. राठोड म्हणाले. 

मास्टरमाइंड प्रा. चंदनकुमार शर्मासह पाच जणांना अटक केली असून रिव्हॉल्व्हर, १५ काडतुसे, दोन लाख ३१ हजार, दुचाकी जप्त केली.
- डॉ. शिवाजी राठोड, पोलिस अधीक्षक, लातूर

Web Title: Murder crime police mastermind