एकतर्फी प्रेमातून रक्तपात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

शहरात खळबळ उडवून देणाऱ्या तिहेरी हत्याकांडप्रकरणी बुधवारी खुनी आरोपीने पोलिसांसमोर तोंड उघडले नसले तरी प्रेमाला नकार दिल्याने हा रक्तपात घडल्याचा नवीन खुलासा आता समोर आला आहे. आरोपी अमोल बोर्डे याने मित्राच्या बहिणीवर प्रेम करीत असल्याचे सांगून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिने प्रतिकार करून त्याला हाकलून लावले होते. प्रेमाचा नकार पचवता आला नसल्यानेच आरोपीने हे हत्याकांड घडवून आणल्याचे समोर येत आहे.

औरंगाबाद - शहरात खळबळ उडवून देणाऱ्या तिहेरी हत्याकांडप्रकरणी बुधवारी खुनी आरोपीने पोलिसांसमोर तोंड उघडले नसले तरी प्रेमाला नकार दिल्याने हा रक्तपात घडल्याचा नवीन खुलासा आता समोर आला आहे. आरोपी अमोल बोर्डे याने मित्राच्या बहिणीवर प्रेम करीत असल्याचे सांगून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिने प्रतिकार करून त्याला हाकलून लावले होते. प्रेमाचा नकार पचवता आला नसल्यानेच आरोपीने हे हत्याकांड घडवून आणल्याचे समोर येत आहे. 

प्रकरणात मृत दिनकर भिकाजी बोराडे यांची विवाहित मुलगी विमल गजानन गावडे (३५, रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) हिने तक्रार दिली. तक्रारीनुसार, विमलचे लग्न १८ वर्षांपूर्वी गजानन गावडेशी झाले होते. मात्र, त्यांच्यात पटत नसल्याने सात-आठ महिन्यांपासून विमल ही एक मुलगी व मुलाला घेऊन आई-वडिलांकडे चौधरी कॉलनीत राहण्यासाठी आली होती.

सोमवारपर्यंत पोलिस कोठडी 
अमोलला अटक करून न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत (ता. ३०) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले. सुनावणीदरम्यान सहायक सरकारी वकील एन. ए. ताडेवार यांनी खून करण्यामागचा आरोपीचा नेमका उद्देश काय होता, याचा सखोल तपास करणे आहे. आरोपीने कोणाच्या सांगण्यावरून गुन्हा केला आहे का, आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करणे असून साक्षीदारांचे जबाब नोंदविणे बाकी आहे; तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेला चाकू कोणाकडून आणला किंवा कोणी दिला, याचा तपास करावयाचा असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

लहानपणीच्या ओळखीलाही केले पोरके 
गल्लीत राहणाऱ्या आरोपी अमोल बोर्डेला विमल लहानपणापासून ओळखत होती. तो कामानिमित्त विमलचे आई-वडील दिनकर बोराडे यांच्या घरी येत-जात होता. घटना घडण्याच्या दहा-बारा दिवसांपूर्वी बोराडे कुटुंब कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी विमल एकटीच घरी होती. ही संधी साधत आरोपी अमोल घरी आला व त्याने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे म्हणत तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला; मात्र विमलने प्रतिकार केला असता, आरोपीने तिला धक्का दिला. विमलने तू येथून चूपचाप निघून जा नाही तर आरडाओरड करीन, अशी धमकी दिली. तेव्हा तो तिथून निघून गेला होता.

‘तुम्हा सगळ्यांना बघून घेईन’
आरोपी अमोलच्या या कृत्याबद्दल विमलने कामावरून आलेल्या आईला सांगितले. दोन-तीन दिवसांनंतर विमलच्या आईने आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी अमोलने मी तुमच्या सगळ्यांना बघून घेईन, अशी धमकी दिली. ही बाब विमलच्या आईने विमलला सांगितली. बुधवारी (ता. २५) विमल नेहमीप्रमाणे कामाला गेली असताना सायंकाळी पावणेआठच्या सुमारास बोराडे यांच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने तिला फोन करून अमोल बोर्डे याने आई-वडील व भावाचा खून केल्याची माहिती दिली. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला घटना घडल्यानंतर तत्काळ अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder in love case crime