नांदेडमध्ये जुन्या वादातून एकाचा खून 

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

नांदेड : जुन्या वादातून मारहाण केलेल्या एका युवकाचा उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. २०) रात्री १० वाजता मृत्यू झाला. ही घटना ता. १६ सप्टेंबर रोजी नगिना घाट परिसरात घडली होती. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री खूनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. 

नांदेड : जुन्या वादातून मारहाण केलेल्या एका युवकाचा उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. २०) रात्री १० वाजता मृत्यू झाला. ही घटना ता. १६ सप्टेंबर रोजी नगिना घाट परिसरात घडली होती. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री खूनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कर्नाटक राज्यातील मैलुर (जिल्हा बीदर) येथील नागेश उर्फ आकाशसिंग राजकुमार कडगे (वय १८) हा कामानिमित्त नांदेडला आला होता. तो नगिनाघाट परिसरात राहत असल्याने त्याची नशा करणाऱ्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या युवकांची ओळख झाली. यात तोही नशेच्या आहारी गेल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडे यांनी सांगितले. एक महिण्यापूर्वी त्याच्या पालकांने गावाकडे नेले होते. परंतु तो तिथे थांबला नाही. मला गुरूघरची सेवा करायचे आहे असे म्हणून पुन्हा नांदेडला आला. त्याचा मित्र जसपाल उर्फ जस्सा दिवानसिंग संधु (वय १९, रा. गुरुद्वारा गेट क्रमांक सहा) याने ता. १६ सप्टेंबरच्या रात्री दीडच्या सुमारास नगिनाघाट परिसरात नागेश कडगेला जबर मारहाण केली. हातातील कड्याने नागेश याच्या नाकावर, डोळ्यावर जबर मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. रात्रीच या भागातील नागरिकांनी जखमी अवस्थेत असलेल्या नागेश कडगेला विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असतांना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी जगतसिंग उर्फ जग्गी पोथीवाले यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात रात्री उशिरा जसपालसिंग संधुविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक संदीप शिवले व सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडे यांनी शनिवारी (ता. २१) पहाटे जसपालसिंग संधु याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. सायंकाळी न्यायालयासमोर हजर करणार असल्याचे श्री. बडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder in nanded due to dispute