सवन्यात महिलेची आत्महत्या, दोन चिमुकल्या मुलींचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

सवना (ता. सेनगाव, जि. हिंगोली) - दोन मुली झाल्याच्या कारणावरून सासरी होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारच्याच खोलीत दोन मुलींचे मृतदेह आढळले. छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली, तर सासरच्या मंडळींनी दोन चिमुकल्या मुलींचा गळा आवळून खून केल्याची तक्रार महिलेच्या माहेरच्यांनी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार संशयित चौघांविरुद्ध मंगळवारी (ता. दोन) पहाटे गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोन महिलांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - नांदेड जिल्ह्यातील चिकाळा येथील मनोज देशमुख यांची पुतणी आरती देशमुख यांचा विवाह 2012 मध्ये सवना (ता. सेनगाव) येथील प्रवीण नायक याच्याशी झाला होता.

विवाहानंतर काही दिवसांनी आरतीला सासरच्या मंडळींनी त्रास द्यायला सुरवात केली. त्यातच त्यांना पहिली मुलगी झाली. पहिला मुलगा हवा होता, असे सांगत तिच्या त्रासात आणखी भर पडली. त्यानंतर तिला दुसरीही मुलगी झाली. "तुला व मुलींना मारुन टाकतो,' अशी धमकी पती प्रवीण नायक आरती हिला देत होता. दरम्यान, दोन्ही मुलीच झाल्यामुळे सासरी होणारा छळ असह्य झाल्याने आरतीने सोमवारी (ता. एक) दुपारी साडेचारच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती तिच्या सासरच्या मंडळींनी माहेरी, चिकाळा (जि. नांदेड) येथे दूरध्वनीद्वारे कळविली.

माहेरच्या मंडळींनी रात्री नऊच्या दरम्यान सवना गाठले. तोपर्यंत आरतीचा मृतदेह लटकलेल्या स्थितीतच होता. त्या वेळी घरात सासरची मंडळी आढळली नाही. बाजूच्या खोलीत पूर्वी प्रवीण नायक (वय 4), किरण प्रवीण नायक (2) यांचेही मृतदेह आढळले. दरम्यान, गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र सोनवणे पथकासह दाखल झाले. त्यांनी सासरच्या मंडळींबाबत चौकशी केली. सुरवातीला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली.

आरतीचे काका मनोज देशमुख (रा. चिकाळा, जि. नांदेड) यांनी आज पहाटे गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पूर्वी व किरण नायक यांचा आरतीच्या सासरच्या मंडळींनी गळा आवळून खून केला, सासरच्या त्रासाला कंटाळून आरतीने आत्महत्या केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रवीण नागोराव नायक, नागोराव सदाशिव नायक यांच्यासह अन्य दोन महिलांवर मुलींच्या खुनाचा तर आरतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आज प्रवीण नायक व नागोराव नायक यांना अटक केली. उर्वरित दोघींचा शोध सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी सांगितले. दरम्यान, पोलिस उपाधीक्षक सिद्धेश्‍वर भोरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: murder & suicide