प्रियकरासोबत जाण्यासाठी तिने रचला मृत्यूचा बनाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

असा घडला प्रकार 
संशयित सोनाली शिंदे हिने प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी व आपण या जगातच नाही, असा बनाव रचण्यासाठी स्वतःच आत्महत्या करीत असल्याच्या चिठ्ठ्या लिहिल्या. पती कंपनीत कामाला गेल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने एका अनोळखी महिलेची हत्या करून पळ काढला, अशी धक्कादायक बाब समोर आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

औरंगाबाद -  आत्महत्या करीत असल्याच्या स्वतःच चिठ्ठ्या लिहिल्या. त्यानंतर प्रियकराच्या मदतीने एका महिलेचा खून करीत अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह सोडून तेथून पलायन केले. दुसरीकडे ती मृत असल्याचे समजून पोलिसांनी पतीला अटक केली; पण पोलिसांनी सखोल तपास केल्यावर पत्नीच त्या दुसऱ्या महिलेची मारेकरी असल्याचे समोर आले अन्‌ या फिल्मीस्टाईल हत्याकांडाचा उलगडा झाला; मात्र त्या अर्धवट जळून मृत झालेल्या महिलेची ओळख पटलेली नाही. 

पिसादेवी रस्त्यावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत २४ मे रोजी एका महिलेचा मृतदेह आढळला होता. पत्नीने आत्महत्या केली, असे भासविण्यासाठी पतीने तिच्याकडून चिठ्ठी लिहून तिला पेटवून दिल्याच्या प्रकारात पोलिसांना संशय आला. त्यावरून पतीला अटक केली. वडोदबाजार पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले, उपनिरीक्षक अस्मान शिंदे, सहायक फौजदार नारायण कचकुरी, नाईक राजू डकले यांनी सखोल तपास केला.

त्यावेळी एखाद्या चित्रपटाला साजेशा हत्याकांडाचा उलगडा झाला. या उलगड्यानंतर ग्रामीण पोलिस दल चक्रावले. आता न्यायालयीन कोठडीत असलेल्या पतीची सुटका करण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. 

घटनाक्रमाचा उलगडा सुरू 
या प्रकरणात संशयित सोनालीला चिकलठाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांचे एक पथकच ठाण मांडून आहे; तर दुसरीकडे ज्या महिलेचा खून झाला तिच्याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. ती िमळाल्यावर या घटनाक्रमाचा आणखी उलगडा होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder Suicide Death Cheating Lover Crime