बीडमध्ये गौरीपूजनालाच महिलेचा खून 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

घरांमध्ये गौरीपूजन सुरू असतानाच कुऱ्हाडीचे घाव घालून एका चाळीस वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना बीड  जिल्ह्यात घडली.

नेकनूर (जि. बीड) - सर्वत्र गौरीपूजनाची धामधूम आणि घरांमध्ये गौरीपूजन सुरू असतानाच येथे कुऱ्हाडीचे घाव घालून एका चाळीस वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. सहा) रात्री घडली. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात आरोपीवर खुनासह पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपी ओमकार ऊर्फ राजा सुधाकर काळे (वय 40, मूळ रा. विडा, ता. केज, ह. मु. नेकनूर, ता. बीड) यास अटक केली.  नेकनूरमधील गणेश हॉटेलच्या पाठीमागे मकसूद नर्सरी रोडवरील वस्तीमध्ये राणी काळे या राहतात. आरोपी सुधाकर काळे याच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. या प्रकरणातही ओमकार काळे काही काळ कोठडीची हवा खाऊन आलेला आहे.

दरम्यान, मागच्या काही वर्षांपासून राणी काळे ओमकार काळेसोबत राहत होती. अलीकडच्या काळात दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते. शुक्रवारीही सणासुदीत दोघांमध्ये भांडण झाले. या वेळी ओमकारने महिलेच्या डोक्‍यात आणि अंगावर कुऱ्हाडीचे वार केले. यामध्ये ती जागीच गतप्राण झाली. घटनेनंतर आजारी असल्याचे कारण पुढे करत आरोपी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. हवालदार श्री. ढाकणे यांच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलिस ठाण्यात खून करणे आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमांन्वये गुन्हा नोंद झाला. फौजदार श्री. काळे तपास करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The murder of a woman