जुन्या वादातून खून करणारा अटकेत

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद : नदीतून वाळू घेऊन गेल्याचा जाब विचारल्याच्या जुन्या कारणावरून 38 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्यास संशयितास पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, मंगळवारपर्यंत (ता.15) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आय. के. सूर्यवंशी यांनी शनिवारी (ता.12) दिले. गंगाधर मुळे (वय 38, रा. टाकळी वैद्य ता.जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. 

मृत रामेश्वर म्हस्के यांच्या पत्नी सखुबाई म्हस्के (35, रा. टाकळी वैद्य) यांच्या तक्रारीनुसार, म्हस्के कुटुंब शेतीकाम करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या शेतीच्या बाजूला सुखना नदी आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी त्या नदीतून आरोपी गंगाधर मुळे याने वाळू नेली होती. त्यावेळी रामेश्वर म्हस्के यांनी आरोपीला समजावून सांगितले होते. 30 ऑगस्ट 2019 रोजी पोळ्यानिमित्त आरोपी मुळे हा सायंकाळी म्हस्के यांच्या घरी आला. त्यांना थोडे बाहेर जाऊन येऊ असे म्हणत मुळेने त्याची दुचाकी म्हस्के यांच्या घरी लावली व म्हस्के यांच्या दुचाकीवर दोघे गेले. रात्री म्हस्के घरी आले नाहीत. म्हस्केंच्या मुलाने आरोपीच्या घरी चौकशी केली; मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. शोध घेऊनही न सापडल्याने रामेश्वर म्हस्के हरविल्याची तक्रार चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली. तपासाअंती भाऊसाहेब भालेकर यांच्या शेतात म्हस्के यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर चिकलठाणा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

आरोपी मुळेला शुक्रवारी (ता.11) पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वरील आदेश दिला. प्रकरणात सहायक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी काम पाहिले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murderer accused