महिला पोलिस उपनिरीक्षकास जिवे मारण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

जबाब नोंदविले
मनीषा गिरी यांच्या जबाबामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. यापूर्वी गिरी यांच्या कुटुंबीयांनी वरिष्ठांनी लैंगिक छळ केल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार दिली होती. हा प्रकार गंभीर असल्याने विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी येथे येऊन या घटनेची माहिती घेतली होती. शिवाय संबंधित सर्व लोकांचे जबाब देखील नोंदविण्यात आले होते.

उस्मानाबाद - मे महिन्यात शहरातील महिला पोलिस उपनिरीक्षक मनीषा गिरी राहत्या इमारतीच्या छतावरून पडल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनेबद्दल विविध शंका उपस्थित होत होत्या. आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून, त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार खुद्द मनीषा गिरी यांनी दिली आहे. आनंदनगर पोलिस ठाण्यात पोलिस नाईक आशिष ढाकणे याच्याविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

३१ मे रोजी सकाळी सहाच्या सुमारास शहरातील श्रीकृष्णनगरातील निर्मल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक मनीषा रामदास गिरी ह्या इमारतीवरून पडल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी सुरवातीला मनीषा गिरी यांनी अज्ञात कारणावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यावरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील जखमी महिला पोलिस उपनिरीक्षक मनीषा गिरी यांची प्रकृती ठीक असून, हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू आहेत. उपचार चालू असताना त्यांनी जबाब दिला आहे. पोलिस मोटार परिवहन विभागामध्ये सेवेस असलेला पोलिस कर्मचारी आशिष ढाकणे याने त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याचे नमूद आहे. त्यांच्या जबाबावरून गुन्ह्यात पोलिास नाईक आशिष ढाकणे याच्याविरुद्ध शनिवारी (ता. २९) कलम ३०७ नुसार गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी पोलिस नाईक आशिष ढाकणे यास अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी मोतीचंद राठोड करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murderer Attack on Women Police Officer Crime