दारूच्या बाटलीने तरुणाचा चिरला गळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

देशी दारूच्या दुकानाजवळून जाताना दारुड्याने बाटली अर्धवट फोडून तरुणाच्या गळ्यावर दोन वार केले. यात तरुणाचा गळा चिरून तो गंभीर जखमी झाला. त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ही घटना रेल्वेस्थानक परिसरात गुरुवारी (ता. २५) रात्री आठच्या सुमारास घडली.

औरंगाबाद - देशी दारूच्या दुकानाजवळून जाताना दारुड्याने बाटली अर्धवट फोडून तरुणाच्या गळ्यावर दोन वार केले. यात तरुणाचा गळा चिरून तो गंभीर जखमी झाला. त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ही घटना रेल्वेस्थानक परिसरात गुरुवारी (ता. २५) रात्री आठच्या सुमारास घडली. 
नातेवाइकांकडून प्राप्त माहितीनुसार, अरुण भगवान दाभाडे (वय २०, रा. बनेवाडी) असे गंभीर जखमीचे नाव आहे. तो रात्री रेल्वेस्थानक परिसरातील देशी दारूच्या दुकानाजवळून जात होता. त्यावेळी दुकानाजवळ उभा असलेल्या एकाने त्याच्याशी वाद घातला. 

यानंतर बाटली अर्धवट फोडून त्याने अरुणच्या गळ्यावर दोन वार केले. यात अरुणचा गळा चिरला गेला. यातून मोठा रक्तस्राव झाला. या घटनेची माहिती समजताच अरुणचा भाऊ नितीन दाभाडे यांनी मित्रासोबत घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी अरुणला घाटी रुग्णालयात दाखल केले. अरुणवर उपचार सुरू असून, तो बराच वेळ अत्यवस्थ होता. हल्ल्याबाबत पोलिसांकडून त्याला विचारणा सुरू आहे. या घटनेची माहिती समजताच वेदांतनगरच्या पोलिस पथकाने घाटी रुग्णालयात धाव घेतली. तसेच संशयित हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. तो हमालवाड्यातील असल्याचे व दारूच्या नशेत होता, अशी माहिती समोर आली आहे.

Web Title: Murderer attack on youth Crime