मुस्लिम महामूकमोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

उस्मानाबाद - मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण द्यावे, मुस्लिम शरीयत कायद्यामध्ये हस्तक्षेप करू नये यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने गुरुवारी (ता.5) जिल्हाधिकारी कार्यालयावर महामूकमोर्चा काढण्यात आला. जिल्ह्याभरातून एक लाखापेक्षा अधिक नागरिक सहभागी झाल्याने शहर परिसर गजबजून गेला होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा पार पडला. 

उस्मानाबाद - मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण द्यावे, मुस्लिम शरीयत कायद्यामध्ये हस्तक्षेप करू नये यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने गुरुवारी (ता.5) जिल्हाधिकारी कार्यालयावर महामूकमोर्चा काढण्यात आला. जिल्ह्याभरातून एक लाखापेक्षा अधिक नागरिक सहभागी झाल्याने शहर परिसर गजबजून गेला होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा पार पडला. 

शहरातील गाझी मैदानावर सकाळपासूनच जिल्हाभरातील मुस्लिम समाजबांधव एकत्र येण्यास सुरवात झाली. बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांसाठी पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी पावणेएकच्या सुमारास गाझी मैदानापासून मोर्चाला सुरवात झाली. देशपांडे थांबा, ताजमहाल टॉकीज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. या ठिकाणी काही मुलांनी मागण्यांचे वाचन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले 
मोर्चामध्ये विविध प्रकारचे फलक घेऊन नागरिक, युवक सहभागी झाले होते. देशाच्या विकासाचे लक्षण, मुस्लिमांना आरक्षण, हमे जवाब चाहिये, जे. एन. यु. का विद्यार्थी नजीब कहा हैं, नही बदलेगा मुस्लिम पर्सनल लॉ, तिरंगा हमारी शान है, मुसलमानों की जान है, असा मजकूर असलेले फलक घेऊन युवक मोर्चात सहभागी झाले होते. सर्वांत पुढे शालेय विद्यार्थी होते. केसरी, त्यानंतर पांढरे आणि त्यांच्यामागे हिरव्या रंगाचे पागोटे परिधान करून सहभागी विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. मोर्चातील तीन युवकांनी राष्ट्रध्वज हातामध्ये घेतला होता. दिव्यांग नागरिकही या मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंतचे मोर्चेकऱ्यांनी फुलून गेले होते. 

समाजाच्या प्रमुख मागण्या 
मुस्लिम समाजाला शिक्षण, नोकरीमध्ये विविध समित्यांनी सुचविल्यानुसार आरक्षण द्यावे, मुस्लिम शरीयत कायद्याचा हस्तक्षेप नसावा, अल्पसंख्याक संरक्षणासाठी अल्पसंख्याक समाज अत्याचार प्रतिबंध विधेयक 2015 चे कायद्यात रूपातंर करून त्याची अंमलबजावणी करावी, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे मुस्लिम विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शिष्यवृती उपलब्ध करून द्यावी, बेरोजगारांना उद्योगसाठी शासनस्तरावर बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, महाराष्ट्रातील गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावा, ऊर्दू भाषेच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करावा, भोपाळ कारागृहातील कैद्यांच्या बनावट चकमकीची (एन्काउंटर) चौकशी होऊन दोषींना कडक शिक्षा व्हावी, जे.एन.यूमधील मुस्लिम तरुण नेतृत्व नजीब याचा शोध घेऊन त्या प्रकरणाची उच्चस्तरावर चौकशी करावी.

Web Title: muslim mahamukmorcha