मुस्लिम समाजाचा मंगळवारी शहरात मूकमोर्चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

बीड - मुस्लिम समाजाला आरक्षण आणि संरक्षण मिळावे यासह  विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. २०) बीडमध्ये मुस्लिम आरक्षण मूकमोर्चा निघणार आहे. जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रगीताने मोर्चाची सुरवात होईल, तर जिल्हाधिकरी कार्यालयावर मोर्चा संपल्यानंतर दुवा अदा करून सांगता होणार आहे. मोर्चात तिरंगे ध्वज घेऊन मोर्चेकरी सहभागी होणार असल्याची माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.

शासनाने मुस्लिम आरक्षण तत्काळ लागू करावे, मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करू नये, समान नागरी कायदा लागू करू नये, मुस्लिम संरक्षणासाठी कडक कायद्याची तरतूद करावी, निर्दोष मुस्लिम युवकांना विनाचौकशी दहशतवाद कायद्याखाली अटक करू नये, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे. मोर्चाच्या जनजागृतीसाठी जागोजागी बैठका, कॉर्नर सभा होणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. जिल्हा क्रीडा  संकुल येथून निघणारा मोर्चा सुभाष रोड, माळीवेस, धोंडीपुरा, मिल्लिया कॉलेज, किल्ला मैदान, बलभीम चौक मार्गे कारंजा रोडकडे निघेल.

मिल्लिया महाविद्यालयात शालेय विद्यार्थी एकत्र जमतील. मोर्चा बलभीम चौकात आल्यानंतर ही मुले मोर्चात सामील होतील. त्यानंतर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर येईल. या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते निवेदन दिले जाणार आहे.  

फराळ, पाण्याची सोय
मंगळवारी निघणाऱ्या मुस्लित मोर्चात विविध ठिकाणी अल्पोपाहार व पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मोर्चासाठी दुसऱ्या गावांवरून येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठीही कोटेकोरपणे नियोजन करण्यात येत आहे.
 
मोर्चात मुस्लिम बांधवांनी सहभागी व्हावे - जकेरिया 
बीड - मुस्लिम समाज आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असून प्रगतीपासून वंचित आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. त्यासाठी जिल्ह्यातील मुस्लिम समाजातर्फे मंगळवारी (ता. २०) मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे शारेख जकेरिया यांनी केले आहे. 

Web Title: musslim society mukmorcha