माझी मुलगीच करेल; माझे स्वप्न साकार! 

मधुकर कांबळे 
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

"माझी कन्या भाग्यश्री'ने जिल्ह्यातील समाजमन बदलले. एका किंवा दोन मुलीनंतर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्यास पालक राजी होत असल्याचे "माझी कन्या भाग्यश्री योजने'ला मिळत असलेल्या प्रतिसादावरून दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात या योजनेच्या लाभार्थींच्या संख्येमध्ये वाढ झाली.

औरंगाबाद - शिक्षणाने आणि समाजाची मानसिकता बदलत असल्याने मुलगाच हवा हा अट्टाहास आता काहीअंशी कमी होत आहे. समाजमनाची मानसिकता बदलण्याचे काम महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात येणाऱ्या लोकजागृतीमुळे बदलत असून, एका किंवा दोन मुलीनंतर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्यास पालक राजी होत असल्याचे "माझी कन्या भाग्यश्री योजने'ला मिळत असलेल्या प्रतिसादावरून दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या योजनेच्या लाभार्थींच्या संख्येमध्ये वाढ झाली असल्याचे जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले. 

मुलगी ही ओझे नाही तर ती वृद्धापकाळात आई-वडिलांना आधार देते, मोठी होऊन माहेर-सासर दोन्हीकडच्या लोकांची आपुलकीने काळजी घेते हे दूरदर्शन वाहिन्यांच्या मालिकांमधूनही पाहायला मिळत आहे. मुलगा नसल्याची खंत व्यक्‍त करणे सोडून मुलगी असल्याचे समाधान मानणाऱ्यांचे प्रमाण वाढावे यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून एक ऑगस्ट 2017 पासून सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजना राबवण्यात येत आहे. श्री. मिरकले यांनी सांगितले. 

अशी आहे योजना 

या योजनेअंतर्गत एका मुलीच्या जन्मानंतर पालकांपैकी एकाने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेतली असेल, तर मुलीच्या नावाने 50 हजार रुपयांची तर दोन मुलीनंतर कुटुंबनियोजन करून घेतले असेल तर दोन्ही मुलींच्या नावाने प्रत्येकी 25 हजार रुपयांची मुदत ठेव बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये ठेवण्यात येते. मुलगी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर ही रक्‍कम त्या मुलीला मिळते. गेल्यावर्षी या योजनेचा 16 कुटुंबांना लाभ देण्यात आला. यावर्षी ही संख्या वाढली आहे. यावर्षी 47 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी 28 जणांना लाभ देण्यात आला असून, 19 जणांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. एक ऑगस्ट 2017 नंतर जन्म झालेल्या मुलींचे पालक यासाठी अंगणवाडी सेविकेमार्फत प्रस्ताव सादर करू शकतात. 

लोकांची मानसिकता तयार करण्यासाठी अंगणवाडी सेविकांमार्फत नियमित बैठकात मुलीचे महत्त्व, योजनेविषयीची माहिती दिली जाते. गेल्या वर्षी गावोगावी या योजनेविषयीचा चित्ररथ फिरवण्यात आला होता. अनेक प्रकारे या योजनेविषयी जागृती केल्याचा परिणाम आता दिसत आहे. एकदा योजना लोकांमध्ये पोचली की ती योजना लोकच पुढे नेत असतात. ही योजनाही लोकांपर्यंत पोचली असल्याने मुलगा-मुलगी असा भेदभाव मानण्याचे प्रमाण कमी होत आहे. 

प्रसाद मिरकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, 
महिला व बालविकास, जिल्हा परिषद 

मला एकच मुलगी आहे. एका मुलीनंतर आम्ही कुटुंबनियोजन करून घेतले आहे. आज मुलीदेखील सक्षम झाल्यात. त्या आई-वडिलांची काळजी घेत आहेत. यामुळे मुलगा-मुलगी तसा भेद मी मानत नाही. दोन-चार मुले असण्यापेक्षा एकाच मुलीचे चांगल्या प्रकारे संगोपन करून, तिला चांगले शिक्षण देऊन तिचे भविष्य घडवले तर तीही आई-वडिलांची स्वप्न साकार करू शकते. यामुळे मुलाची कशाला अपेक्षा करावी. 

 नितीन वालूरकर, सिडको. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My daughter will; Make my dream come true!