नाफेडतर्फे तीन हजार क्विंटलची तूर खरेदी

प्रकाश बनकर
मंगळवार, 24 एप्रिल 2018

नोंदणी झालेल्यापैंकी केवळ 386 शेतकऱ्यांचे तूर खरेदी झाली आहे. मात्र, शंभरहून अधिक शेतकऱ्यांची तूर खरेदी होणे बाकी आहे. 18 एप्रिलपासून तूर खरेदी प्रक्रिया बंद केल्यामुळे या शेतकऱ्यांचा तुरीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद : 'नाफेड'तर्फे ऑनलाइन तूर खरेदी-विक्री केंद्रावर चांगला हमीभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाच फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या या केंद्रावर आतापर्यंत 386 शेतकऱ्यांची 3 हजार 181  क्विंटल तूर खेरदी करण्यात आली, अशी माहिती नाफेडतर्फे देण्यात आली. 

तुरीला पाच हजार 500 रुपयांचा हमी भाव मिळावा, व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबावी या उद्देशाने शासनाने नाफेडतर्फे मागील वर्षापासून ऑनलाइन पद्धतीने तूर खरेदी सुरू केली होती. ही तूर खरेदी 18 एप्रिलपर्यंत सुरु ठेवण्यात आली होती. शेतकऱ्यांचा ऑनलाइन खरेदी-विक्रीला मोठा प्रतिसाद मिळला आहे. बाजार समितीच्या केंद्रावर नऊ फेब्रुवारीपासून ऑनलाइन खरेदी-विक्री सुरू झाली. बाजार समितीतील केंद्रावर 490 शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यातील 386 शेतकऱ्यांची तीन हजार 181 क्विंटल तूर 18 एप्रिल पर्यंत खरेदी करण्यात आली आहे. 

17 फेब्रुवारीपर्यंत 76 शेतकऱ्यांच्या खात्यात 33 लाख 46 हजार 30 रुपये जमा करण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांचे पैसेही त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असल्याचेही नाफेडने सांगितले. बाजार समितीत प्रत्यक्षात दोन एप्रिलपासून तुर खरेदी सुरु करण्यात आली होता. 

महिना--------- शेतकरी संख्या-------- नाफेडने खरेदी केलेली तुर (क्‍विंटलात) 
फेब्रुवारी---------- 150 ----------- 1 हजार 119क्‍विटंल 
मार्च ------------- 173 ------------ 1 हजार 443 
एप्रिल------------- 63-------------- 619 
एकुण------------386-------------- 3 हजार 181 क्‍विंटल

Web Title: NAFED 3 thousand Quintle Purchased