ऑगस्टशेवटी सुरू होणार नाफेडचे खरेदी केंद्रे

file photo
file photo

औरंगाबाद : हंगाम 2019-20 साठी केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ऑगस्ट महिन्याच्या शेवटी "नाफेड'कडून उडीद, मूग, सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहेत. त्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात खरेदी-विक्री संघ, पणन प्रक्रिया सहकारी संस्था, सहकारी संस्था, खासगी बाजार समित्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. 


मागील वर्षी मक्का व कपाशी पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी उडीद, मूग, सोयाबीन पिकांचा पेरा करण्याला प्राधान्य दिले. यंदाही मक्का पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मक्काच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मागील वर्षी तूर खरेदी केंद्र सुरू करण्यास उशीर झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. यंदा शेतकऱ्यांनी तूर विक्रीदरम्यान होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने अगोदरच खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 


यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूगाचा पेरा घेण्याकडे जास्त भर दिला. जिल्ह्यात 70 ते 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पीकपेरा झाला आहे. खरेदी केंद्र निश्‍चित करण्यासाठी केंद्र सुरू करण्याकरिता इच्छुक खरेदी संस्थेकडे; तसेच फेडरेशनच्या "अ' वर्ग व "ब' वर्ग संस्थेकडून प्रस्ताव मागविले आहेत. त्यानुसार संबंधित संस्था, खासगी बाजार समित्यांनी 19 ऑगस्टपर्यंत आपले प्रस्ताव सादर करावे.

खरेदी करणाऱ्या संस्थेकडे साधनसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध असल्याचा दाखला देणे आवश्‍यक असून, मॉयश्‍चर मीटर, चाळणी, ताडपत्री, संगणक, संगणक चालविणे क्षमता असलेले जनरेटर, स्कॅनर असलेला स्मार्टफोन, संगणक हाताळणी करता प्रशिक्षकासह इलेक्‍ट्रॉनिक वजन काटा असणे आवश्‍यक आहे.

 डी. आर. मातेरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com