निलंगा, उदगीरवर भाजपचा झेंडा

औसा येथील नगराध्यक्षपदी विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अफसर शेख यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.
औसा येथील नगराध्यक्षपदी विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अफसर शेख यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.

औशाचा किल्ला ‘राष्ट्रवादी’कडे; अहमदपूरमध्ये वाजली शिटी; काँग्रेस झाली भुईसपाट

लातूर - लातूर जिल्ह्यात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत निलंगा व उदगीर नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाने झेंडा फडकविला आहे. औशाचा किल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकला आहे; तर अहमदपूरमध्ये बहुजन विकास आघाडीची शिटी वाजली. या निवडणुकीत काँग्रेस मात्र भुईसपाट झाली आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा, उदगीर, औसा व अहमदपूर या चार नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. यात निलंगा येथे भारतीय जनता पक्षाचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपले आजोबा काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडून सत्ता खेचून घेतली आहे. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या पालिकेत आता नगराध्यक्षासह भाजपचे १७, काँग्रेसचे फक्त दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला आहे. औशात काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आमदार बसवराज पाटील यांचे पानिपत झाले आहे. औशाचा किल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ताब्यात घेतला आहे. येथे नगराध्यक्षासह राष्ट्रवादी काँग्रेसचे १२, काँग्रेसचे फक्त दोन तर भारतीय जनता पक्षाचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. 

उदगीरमध्ये गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासूनची काँग्रेसचे राजेश्वर निटुरे यांची सत्ता भारतीय जनता पक्षाने उलथवून टाकली आहे. येथे नगराध्यक्षासह भारतीय जनता पक्षाचे १८, काँग्रेसचे १४ व एमआयएमचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत.

तर अहमदपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत बहुजन विकास आघाडीची शिटी वाजली आहे. येथे माजी राज्यमंत्री आमदार विनायक पाटील यांचा नगराध्यक्ष झाला आहे. तसेच त्यांचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ, भारतीय जनता पक्षाचे सहा, काँग्रेसचे दोन तर शिवसेनेचे दोन उमेदवार  विजयी झाले आहेत. या चारही पालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसचे मात्र पानिपत झाले आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे मात्र वजन वाढले आहे.

औशात नगराध्यक्षपदी ‘राष्ट्रवादी’चे डॉ. अफसर शेख
औसा - नगर परिषदेच्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. अफसर शेख यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली असून त्यांनी प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किरणप्पा उटगे यांच्यापेक्षा तब्बल २ हजार १६५ मतांची आघाडी घेऊन विजय मिळविला आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने नगरसेवकपद निवडणुकीत दहा प्रभागांतून वीसपैकी १२ उमेदवार निवडून आणून एकहाती सत्ता संपादन केली आहे. औसा नगर परिषदेच्या थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून देण्याच्या प्रक्रियेची (ता. १५ डिसेंबर) मतमोजणी दुपारी पूर्ण झाली. त्यात नगराध्यक्षपदासाठी विविध पक्षांचे व अपक्ष मिळून १३ उमेदवार व १० प्रभागांतील २० जागांसाठी १०१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्याच्या मतमोजणीनंतर नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे डॉ. अफसर शेख यांनी बाजी मारली. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सुनीलप्पा मिटकरी तिसऱ्या स्थानावर राहिले तर काँग्रेसचा उमेदवार डॉ. इमरान पटेल यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. नगरसेवक पदाच्या १० प्रभागांतील २० जागांवर निवडून आलेले राष्ट्रवादीचे उमेदवार प्रभाग तीनमधून जावेद शेख, कीर्ती कांबळे, प्रभाग चारमधून परवीन शेख, गोविंद जाधव, प्रभाग पाचमधून अलीशेर कुरेशी, फरीदाबेगम नांदुर्गे, प्रभाग सहामधून जहॉआरा तत्तापुरे, मेहराज शेख प्रभाग नऊमधून सलीमाबेगम सय्यद, भरत सूर्यवंशी व प्रभाग दहामधून डॉ. अफसर शेख, नझमूनबी इनामदार या विजयी झाल्या आहेत. भाजपचे प्रभाग दोनमधून उन्मेष वागदरे, शिल्पा कुलकर्णी प्रभाग सातमधून गोपाळ धानुरे, लक्ष्मीबाई माळी व प्रभाग आठमधून सुनील उटगे, शांताबाई बनसोडे विजयी झाले आहेत. काँग्रेसचे केवळ दोनच उमेदवार निवडून आले असून त्यात प्रभाग एकमधून अंगद कांबळे व मंजूषा हजारे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या विद्यमान नगराध्यक्षा नीता कांबळे यांचा नगरसेवकपदासाठीच्या निवडणुकीत दयनीय पराभव झाला असून त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. 

डॉ. अफसर शेख यांची नगरसेवकपदासाठीही हॅट्ट्रिक 
डॉ. अफसर शेख यांनी नगराध्यक्ष पदाबरोबरच प्रभाग दहामधूनही नगरसेवक पदासाठी उभे राहिले होते. तेथे त्यांना सर्वात विक्रमी मतदान झाले असून काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार खैरातमियाँ शेख यांच्यापेक्षा तिपटीने (८८४) अधिक मतांनी विजय मिळविला आहे.

आई-वडिलांची पुण्याई, त्यांचे समाजासाठीचे योगदान, त्यांचा आशीर्वाद या गोष्टीबरोबरच अवर्षणग्रस्त परिस्थितीत व आतापर्यंत आम्ही केलेल्या कामावर जनतेने कौल दिला आहे. आम्ही शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करूत. दुष्काळातील घरपट्टी व नळपट्टी माफ करणे, शहराला विकासाचे मॉडेल करणे या बाबींसाठी प्रयत्नशील राहू.
- डॉ. अफसर शेख, नवनिर्वाचित नगराध्यक्ष

अहमदपूरच्या नगराध्यक्षपदी अश्‍विनी कासनाळे 
अहमदपूर - आमदार विनायकराव पाटील प्रणीत बहुजन विकास आघाडीच्या अश्‍विनी कासनाळे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या. भारतीय जनता पक्षाच्या रजनी रेड्डी यांचा ३६८ मतांनी त्यांनी पराभव केला.

नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात असले तरी लढत झाली ती बहुजन विकास आघाडीच्या अश्‍विनी कासनाळे, भाजपच्या रजनी रेड्डी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहनाजबी शेख यांच्यातच. काँग्रेसच्या ख्वाजाबेगम शेख चौथ्या, तर शिवसेनेच्या कल्पना रेड्डी पाचव्या क्रमांकावर गेल्या.

एमआयएमच्या यास्मीन सय्यद यांना नगण्य मते पडली. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये गुरुवारी (ता. १५) सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. अवघ्या दीड तासाच्या आत सर्व निकाल जाहीर झाले. बहुजन विकास आघाडीच्या अश्‍विनी कासनाळे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली ती त्यांनी तिसऱ्या फेरीअखेर टिकवून ठेवली. पहिल्या फेरीत अश्‍विनी कासनाळे यांना एक हजार ५७२, भाजपच्या रजनी रेड्डी यांना एक हजार ३७०, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहनाजबी शेख यांना एक हजार १७६ तर, काँग्रेसच्या ख्वाजाबेगम शेख यांना ५८३ एवढी मते पडली. दुसऱ्या फेरीत अश्‍विनी कासनाळे यांना एक हजार ५८९, रजनी रेड्डी यांना एक हजार ४००, शहनाजबी शेख यांना एक हजार १३९ तर, ख्वाजाबेगम शेख यांना ५४८ मते पडली. तिसऱ्या फेरीत अश्‍विनी कासनाळे यांना एक हजार ९४०, रजनी रेड्डी यांना एक हजार ६७७, शहनाजबी शेख यांना एक हजार ९२६ तर, ख्वाजाबेगम शेख यांना ५३८ एवढी मते मिळाली.

चौथ्या फेरीत भाजपच्या रजनी रेड्डी यांनी आघाडी घेतली. त्यांना एक हजार ५८९ मते पडली तर, बहुजन विकास आघाडीच्या अश्‍विनी कासनाळे यांना एक हजार २२१ एवढीच मते पडली; परंतु श्रीमती कासनाळे यांची पूर्वीची आघाडी असल्याने त्या एकूण मताधिक्‍क्‍याने पुढेच राहिल्या. तसेच इतर उमेदवार स्पर्धेतून बाहेर फेकले गेले. पाचव्या फेरीत कासनाळे यांना १०८, रजनी रेड्डी यांना २६, शहनाजबी शेख यांना २६२, तर ख्वाजाबेगम शेख यांना १४१ मते पडली. पाचव्या फेरीअखेर बहुजन विकास आघाडीच्या अश्‍विनी कासनाळे या ३६८ मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.
 

उदगीरच्या नगराध्यक्षपदी बसवराज बागबंदे
उदगीर - अटीतटीच्या झालेल्या पालिका निवडणुकीमध्ये भाजपचे बसवराज बागबंदे यांनी २८७९ मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे हे दुसऱ्या, तर एमआयएमचे ताहेर हुसेन हे तिसऱ्या स्थानावर राहिले.

मतमोजणी दहा फेऱ्यांमध्ये पूर्ण झाली. पहिल्या फेरीत एमआयएमचे ताहेर हुसेन यांना २४०४; तर भाजपचे बसवराज बागबंदे यांना १२७१; तर काँग्रेसचे राजेश्वर निटुरे यांना ८०० मते मिळाली. पहिल्या फेरीत एमआयएमला ११३३ मतांची आघाडी मिळाली. दुसऱ्या फेरीअखेर एमआयएमला १२८३ मतांची आघाडी मिळाली. तिसऱ्या फेरीअखेर एमआयएमला ३३७४ मतांची आघाडी मिळाली. चौथ्या फेरीअखेर एमआयएमला २५१० मतांचीच आघाडी मिळाली. पाचव्या फेरीअखेर एमआयएमला २५२१ मतांची आघाडी मिळाली. सहाव्या फेरीअखेर एमआयएएमची आघाडी फक्त १७३४ मतांचीच राहिली.

सातव्या फेरीअखेर भाजपचे बसवराज बागबंदे यांनी १७३४ मतांची आघाडी तोडून ११० मतांची आघाडी घेतली. आठव्या फेरीअखेर भाजपाने ७४७ मतांची आघाडी घेतली. नवव्या फेरीत भाजपने २९३१ मतांची आघाडी घेतली. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एमआयएमची आघाडी तोडून काँग्रेसने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. दहाव्या फेरीअखेर भाजपचे श्री. बागबंदे यांनी २८७९ मतांच्या फरकाने अखेर विजय मिळवला. भाजपच्या बागबंदे यांनी १६ हजार ६३१, तर काँग्रेसच्या निटुरे यांनी १३ हजार ७५२ आणि एमआयएमचे हुसेन यांनी १२८५८ मते मिळवली.

उमेदवारनिहाय मिळालेली मते अशी
बसवराज बागबंदे (भाजप) १६६३१
शरद तेलघाने (रासप) ३०५
राजेश्वर निटुरे (काँग्रेस) १३७५२
कैलास पाटील (शिवसेना) ८२८
सत्यनारायण बिरादार (बमुपा) ३४५
विद्याकांत अंबेसंगे (अपक्ष)३५९ 
नरसिंग घोणे (अपक्ष)१०९
श्‍याम वट्टमवार (अपक्ष)६६
शहाजहान शेख (अपक्ष)१०९
समीर शेख (राष्ट्रवादी काँग्रेस) १९४२
ताहेर हुसेन (एमआयएम) १२८५८
आशद सिद्घीकी (अपक्ष)८४
 नोटा १६१
 

निलंग्यात नगराध्यक्षपदी भाजपचे श्रीकांत शिंगाडे
निलंगा - निलंगा नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे श्रीकांत शिंगाडे यांनी त्यांचे काका व काँग्रेसचे उमेदवार गोविंद शिंगाडे यांचा तब्बल २१२२ मतांनी पराभव करीत विजयश्री खेचून आणली आहे. त्यांच्या या विजयाने राज्याचे कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचे आजोबा व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर पुन्हा एकदा मात केली आहे.

निलंग्याच्या राजकारणातील आजोबा - नातवाच्या सत्तासंघर्षात नव्या निवडणुकीची भर पडली आहे.  

निलंगा नगरपालिका निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविल्याने याचा फायदा काँग्रेसला होईल, अशी राजकीय वर्तुळात अटकळ बांधण्यात येत होती. भाजपकडून श्रीकांत शिंगाडे, काँग्रेसकडून गोविंद शिंगाडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून इस्माईल लदाफ, शहर विकास आघाडीकडून अजित निंबाळकर, शिवसेनेकडून सुभाष शिंदे अशी पंचरंगी लढत झाली असली निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यांमध्ये खरी लढत काँग्रेस व भाजपमध्ये झाली असून राष्ट्रवादीचा उमेदवार तिसऱ्या तर शहर विकास आघाडीचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर गेला आहे. शिवाय शिवसेनाही पाचव्या क्रमांकावर फेकली गेली. या निवडणुकीमध्ये खरी चुरस ‘निलंगेकर विरुध्द निलंगेकर’ अशीच झाली आहे. भाजपचे उमेदवार श्रीकांत शिंगाडे हे माजी नगरसेवक असून त्यांच्या पत्नी सध्या नगरसेवक होत्या तर काँग्रेसचे गोविंद शिंगाडे हे चारवेळा नगरसेवक व विविध विषय समित्यांचे सभापती राहिले आहेत. भाजपने पूर्वीपासून जोरदार वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे सुरवातीच्या प्रभागापासून त्यांचे मताधिक्‍य वाढत गेले आहे. त्यामुळे या उमेदवारास पहिल्या फेरीपासून मताधिक्‍य राहिले असून मोठ्या मतांनी ही जागा भाजपने खेचली आहे. तर काँग्रेसला नगरसेवक पदासह नगराध्यक्षपदाचा गडही राखता आला नाही. मोठ्या मताधिक्‍याने हा पराभव झाला आहे. 

या विजयाबाबत नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीकांत शिंगाडे म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. जनतेने मोठ्या विश्‍वासाने नगराध्यक्षपद व एकहाती सत्ता दिली असून शहरातील मूलभूत समस्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्यामार्फत शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निधी आणण्यात येणार असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे व आशीर्वादामुळे आम्हाला हा मान मिळाला आहे.

नगराध्यक्षपद - उमेदवारांना पडलेली मते 
श्रीकांत शिंगाडे (भाजप) - ७४७३
गोविंद शिंगाडे (काँग्रेस) - ५३५१
इस्माईल लदाफ (राष्ट्रवादी) - २०८७
अजित निंबाळकर (शहर विकास आघाडी) - १११२
सुभाष शिंदे (शिवसेना) - १०१८
तुराब बागवान (एम.आय.एम.) - ३०६
झटिंगराव म्हेत्रे (अपक्ष) - १०९.
(भाजपचे श्रीकांत शिंगाडे २१२२ मतांनी विजयी)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com