नांदेडने कॉंग्रेसला तारले, कमळ पुन्हा फुलले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नांदेड - नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत नांदेडने कॉंग्रेसला तारले असून, भाजपचे कमळ पुन्हा फुलले आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्यात नऊ नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीत त्यांच्याच पक्षाने बाजी मारली आहे. नऊ नगराध्यक्ष पदांपैकी हदगाव, धर्माबाद, बिलोली, देगलूर, मुखेड आणि कंधार या सहा ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. कुंडलवाडीत भाजप, उमरीत राष्ट्रवादी, मुदखेडला अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष झाला आहे.

नांदेड - नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत नांदेडने कॉंग्रेसला तारले असून, भाजपचे कमळ पुन्हा फुलले आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्यात नऊ नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीत त्यांच्याच पक्षाने बाजी मारली आहे. नऊ नगराध्यक्ष पदांपैकी हदगाव, धर्माबाद, बिलोली, देगलूर, मुखेड आणि कंधार या सहा ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. कुंडलवाडीत भाजप, उमरीत राष्ट्रवादी, मुदखेडला अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष झाला आहे. एकूण विजयी सदस्यसंख्येत कॉंग्रेस प्रथम क्रमांकावर असून राष्ट्रवादी दुसऱ्या, भाजप तिसऱ्या, तर शिवसेना चौथ्या स्थानावर आहे. माहूर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला, तर अर्धापूर नगरपंचायतीत कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मुदखेड, धर्माबाद, मुखेड आणि कंधार नगरपालिकेत सत्ता एकाची आणि नगराध्यक्ष विरोधी पक्षाचा अशी स्थिती आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात चारपैकी दोन नगराध्यक्षपदे कॉंग्रेसला मिळाली आहेत. अन्य दोन ठिकाणी भाजप आणि शिवसेना-भाजप युतीचा उमेदवार विजयी झाला आहे.

या निवडणुकांची सोमवारी (ता. 19) मतमोजणी झाली. नांदेड जिल्ह्यात अनेक मातब्बरांना पराभवाचा झटका बसला आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुका चुरशीच्या झाल्या. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात मुदखेडला कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला असून त्या ठिकाणी मुजीब अन्सारी हे अपक्ष निवडून आले आहेत. त्याचबरोबर आमदार प्रताप पाटील चिखलीकर (कंधार), आमदार डॉ. तुषार राठोड (मुखेड), आमदार नागेश पाटील आष्टीकर (हदगाव), आमदार सुभाष साबणे (मुखेड, देगलूर, कुंडलवाडी, बिलोली) यांनादेखील चांगलाच फटका बसला असून, त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. मुखेडमध्ये भाजपाची सत्ता आली असली तरी नगराध्यक्षपदाचे त्यांचे उमेदवार गंगाधर राठोड यांना पराभूत व्हावे लागले आहे. भाजपाचे आमदार डॉ. तुषार राठोड यांचे ते बंधू आहेत.

कुंडलवाडी नगरपालिका भाजपने एकहाती सत्ता मिळवत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. अरुणा कुडमलवारही विजयी झाल्या आहेत. उमरी नगरपालिकेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी एकहाती विजय मिळविला असून सर्व 17 जागा मिळवून नगराध्यक्षपदी अनुराधा खांडरे विजयी झाल्या आहेत. बिलोलीत कॉंग्रेसच्या मैथिली कुलकर्णी नगराध्यक्षा झाल्या असून कॉंग्रेसला तिथे स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

कंधारला सत्ता शिवसेनेची तर नगराध्यक्ष कॉंग्रेसचा, मुदखेडला सत्ता कॉंग्रेसची, नगराध्यक्ष अपक्ष तर मुखेडमध्ये सत्ता भाजप-शिवसेनेची तर नगराध्यक्ष कॉंग्रेसचा निवडून आला आहे. धर्माबादलाही अशीच स्थिती असून तेथे राष्ट्रवादीची सत्ता आणि कॉंग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. देगलूरला नगराध्यक्षपदाचे कॉंग्रेसचे उमेदवार मोगलाजी शिरसेटवार यांनी राष्ट्रवादीचे लक्ष्मीकांत पद्मावार यांचा पराभव केला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीची दोन टर्म सत्ता होती. ती आता कॉंग्रेसने नगराध्यक्षपदामध्ये खेचून आणली आहे. एमआयएमनेही नांदेड जिल्ह्यात अर्धापूर आणि माहूर येथे प्रवेश केला आहे. बसपाने मुदखेड आणि धर्माबादमध्ये प्रत्येकी एक, समाजवादी पक्षाने धर्माबादमध्ये एक तर राष्ट्रीय समाज पक्षाने मुखेडमध्ये दोन जागा पटकाविल्या आहेत. बिलोलीत लोकभारती आघाडीने चार जागा जिंकल्या आहेत तर अपक्ष सात जागांवर निवडून आले आहेत.

- नांदेड जिल्ह्यात नऊपैकी सहा, तर औरंगाबाद जिल्ह्यात चारपैकी दोन ठिकाणी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष
- नांदेडला विजयी सदस्यांत कॉंग्रेस प्रथम, राष्ट्रवादी दुसऱ्या, भाजप तिसऱ्या, शिवसेना चौथ्या स्थानावर
- अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात मुदखेडला नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत
- नगरपंचायतीमध्ये माहूरला राष्ट्रवादी, अर्धापूरला कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत

Web Title: nagarpalika & nagarpanchyat election