'भाजपनेते करतात मोदींची हुजरेगिरी'
मोदी सांगतील तेवढेच ऐकायचे काम होते, अशी टीका किसान खेत मजदूर कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी (ता. आठ) केली. भाजपमध्ये अनेक नेते दुःखी आहेत. चार राज्यातील निकालानंतर पक्षात फूट पडेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.
औरंगाबाद : "मी म्हणजे राजा. माझ्यासमोर कोणीच नाही, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आविर्भाव असून, सर्वच त्यांची हुजरेगिरी करतात. जीएसटीच्या मुद्यावर मते मांडताच मोदी भडकले. त्यांचा इगो हर्ट झाला व बैठकच रद्द करण्यात आली. भाजपत अडीच वर्षे बोलण्याची संधीच मिळाली नाही, मोदी सांगतील तेवढेच ऐकायचे काम होते, अशी टीका किसान खेत मजदूर कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी (ता. आठ) केली. भाजपमध्ये अनेक नेते दुःखी आहेत. चार राज्यातील निकालानंतर पक्षात फूट पडेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून भाजपमधून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले पटोले पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, विकासाच्या नावावर देश बरबाद करण्याचे काम सध्या भाजप सरकार करत आहे. रस्त्यांच्या कामांची मोठ-मोठी आकडेवारी सरकार सांगते, मात्र एकही काम शासनाच्या निधीतून होत नाही तर ते कर्ज घेऊन केले जात आहे. 2014 मध्ये देशावर 50 लाख कोटी कर्ज होते, आज एक लाख कोटीच्या पुढे आकडा केला आहे.
राज्यातही हीच स्थिती असून, दीड लाख कोटीचे कर्ज पाच लाख कोटींवर गेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र अशी विचारणा केली होती, मात्र आता त्यांनी राज्यच गायब करून टाकले आहे. फडणवीस सर्वांत वाईट मुख्यमंत्री आहेत, अशी टीका पटोले यांनी केली.