नांदेडमधील 17 हजार 300 कुटुंबांना 'सौभाग्य'चा प्रकाश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

'सौभाग्य' योजनेमुळे आमच्या आयुष्याचे पांग फिटले. लाईट घेणं फक्त स्वप्नच राहतं की काय असे नेहमीच वाटायचे पण सौभाग्य योजना आली आणि आमचे भाग्यच उजळले. घरात प्रकाश आल्याने फक्त दिवसा अभ्यास करणारी आमची पोरंही आता अभ्यास करुन मोठी होतील. मान सन्मान वाढवतील. 

- तानाजी हरिभाऊ कांबळे, रा.पारडी (मक्ता)ता.अर्धापुर

नांदेड : 'प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना' अर्थात “सौभाग्य” योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या नांदेड परिमंडळातील अद्याप घरामध्ये वीज न पोहचलेल्या 17 हजार 358 कुटुंबांना एका महिन्यात वीजजोडणी देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम महावितरणच्या प्रकाशदूतांनी केले आहे, अशी माहिती प्रभारी मुख्य अभियंता संतोष वाहने यांनी दिली. 

देशातील नागरिकांना 24 तास वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबरला 2017 रोजी 'सौभाग्य' योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत केवळ शहरच नव्हे तर दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील खेडेपाडे आणि वाड्यावस्त्यांमधून राहणाऱ्या शेवटच्या घटकांनाही वीजजोडणी द्यावयाची आहे. 

7 जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेतून नांदेड परिमंडळातील वीज जोडणीपासून वंचित असलेल्या 75 हजार 103 कुटुंबियांपैकी  17 हजार 358 कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली आहे. यामध्ये नांदेड परिमंडळात समावेश असलेल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये वीजजोडणीपासून वंचित असलेल्या 39 हजार 774 कुटुंबियांना सौभाग्य योजनेअंतर्गत वीजजोडणी द्यावयाची असून, सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेतून आजपर्यंत 7 हजार 121 कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली आहे. त्याचबरोबर नांदेड जिल्हयातील वीज जोडणीपासून वंचित असलेल्या 27 हजार 479 कुटुंबियांपैकी  4 हजार 507 कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली आहे. तर परभणी जिल्ह्यातील वीजजोडणीपासून वंचित असलेल्या 7 हजार 850  कुटुंबियांपैकी 5 हजार 730 कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली आहे.

या योजनेतून गोरगरिबांना (दारिद्र्य रेषेखालील कुटुंब) मोफत वीजजोडणीसोबतच नऊ वॅटचा एक एलइडी बल्ब आणि एक पिनपॉईंटफिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे. तर वीजजोडणीपासून वंचितअसलेल्या इतर नागरिकांना (दारिद्र्य रेषेवरील कुटुंब) अवघ्या ५०० रुपयांमध्ये वीजजोड मिळणार आहे. हे शुल्कही नियमित वीजबिलासोबत दहा सामान हप्त्यात भरावयाचे आहे.

घरच्या हलाखीच्या परस्थितीमुळे लाईट मीटर घेण्याचं धाडस होत नव्हतं. महावितरणच्या लोकांकडून सौभाग्य्‍ योजनेतून मोफत लाईट देत असल्याचं कळालं आणि आमच्या आनंद गगनात मावना. घरात लाईटआल्याने आता ईचूकाटयाची भिती होती ती गेली. इतरांसारखच आता आमची पोर अभ्यास करतील. मलाही काही पोटापाझ्याचं बघता येईल. 
-अरुणाबाई व्यंकटी कांबळे, रा.पारडी (मक्ता)ता.अर्धापुर.
 ...पूर्ण.. प्रल्हाद कांबळे

Web Title: Nanded 17300 Family got light the scheme of Soubhagya