नांदेडला आघाडीचे भिजत घोंगडेच

अभय कुळकजाईकर
शनिवार, 28 जानेवारी 2017

नांदेड - भाजपसोबत युती होणार नसल्याचे शिवसनेने जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार का, याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेससोबत जाणार की जिल्हा परिषदेच्या गत निवडणुकीप्रमाणे स्वबळावर लढणार, याचा निर्णय एक-दोन दिवसांत अपेक्षित आहे.

नांदेड - भाजपसोबत युती होणार नसल्याचे शिवसनेने जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार का, याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेससोबत जाणार की जिल्हा परिषदेच्या गत निवडणुकीप्रमाणे स्वबळावर लढणार, याचा निर्णय एक-दोन दिवसांत अपेक्षित आहे.

नांदेड जिल्हा परिषदेच्या 63 आणि 16 पंचायत समित्यांच्या 126 जागांसाठी निवडणूक होत आहे. आता शिवसेना-भाजप युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही आघाडी होणार किंवा कसे याबाबत अजूनही काही ठोस संकेत मिळालेले नाहीत. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून (ता. 27) सुरू झाली असून अद्याप कोणत्याही पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. सुरवातीपासूनच कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची संख्या जास्त आहे. आता युती होणार नसल्यामुळे बंडखोरीचे प्रमाण कमी होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषदेची मागील निवडणूक कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजपा या चारही पक्षांनी स्वबळावर लढविली होती. त्यामध्ये कॉंग्रेसला 25, राष्ट्रवादीला 18, शिवसेनेला नऊ आणि भाजपला चार जागा मिळाल्या होत्या. प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या लोकभारती गटाला पाच जागा मिळाल्या होत्या. आता चिखलीकर शिवसेनेचे आमदार आहेत. मागील निवडणुकीवेळी स्थिती वेगळी होती. आता केंद्रात आणि राज्यात सत्ताबदल झालेला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि त्यापाठोपाठ कॉंग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या आहेत. हा कौल लक्षात घेता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत, अशी या क्षेत्रात चर्चा आहे.
जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पहिल्यापासूनच फारसे सख्य नाही. त्यामुळे आघाडी होण्याची शक्‍यता कमीच असल्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. बोलणी सुरू असल्याचे, आघाडीबाबतचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले गेले आहेत, असे सांगितले जात असले, तरी उमेदावारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी अद्याप ठोस निर्णय होताना दिसत नाही. दुसरीकडे भाजपबरोबर युती होणार नाही, हे शिवसेनेने जाहीर केले आहे. त्यामुळे प्रमुख पक्ष स्वबळावर लढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या चारही प्रमुख पक्षांसोबतच एमआयएम, भारिप-बहुजन महासंघ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), स्वाभिमानी शेतकरी संघटनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

Web Title: nanded election