नांदेड : जुगार अड्डा उध्वस्त; चौदा जण अटकेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

सीमावर्ती भागातील मानूर येथे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारून तब्बल चार लाख बावीस हजारांची रोकड मरखेल पोलिसांनी जप्त केलीय. मरखेल पोलिसांनी सोमवारी (ता.९) रोजी मध्यरात्री केलेल्या या मोठ्या कार्यवाहीत सुमारे १४ बडे जुगारी ताब्यात घेतले आहेत.

मरखेल, (जिल्हा नांदेड) : सीमावर्ती भागातील मानूर येथे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारून तब्बल चार लाख बावीस हजारांची रोकड मरखेल पोलिसांनी जप्त केलीय. मरखेल पोलिसांनी सोमवारी (ता.९) रोजी मध्यरात्री केलेल्या या मोठ्या कार्यवाहीत सुमारे १४ बडे जुगारी ताब्यात घेतले आहेत. नव्या अधिकाऱ्याच्या या धाडसी कार्यवाहीमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

कर्नाटक, तेलंगणा सीमेवरील मानूर येथे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. 'नवा गडी नवी आव्हाने' या उक्तीप्रमाणे नवनियुक्त सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी मानूर येथील रुद्रा बार अँड रेस्टोरेंटमध्ये अवैध जुगार अड्डा चालू असल्याच्या माहितीवरून ता.९ रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास छापा टाकला.

यावेळी जुगार खेळणाऱ्या गंगाधर बत्तुलवार (रा. अंतापूर), संतोष पाटील (रा. मानूर), बालाजी लाढे (रा. बीजलवाडी), तस्लिम शेख (रा. हणेगाव), अंबादास राजुळे (रा. हणेगाव) बालाजी कदम (रा. धन्नूर, तेलंगणा), तुकाराम बिरादार (रा. कंठाळी, तेलंगणा), विठ्ठल शिंदे (रा. घुळा, तेलंगणा), दत्तू चिखलपल्ले (रा. कल्लूर, तेलंगणा), अशोक शिवरामे (रा.नागलगाव, तेलंगणा), हणमंत मेरपलवार (रा.एकलारा, तेलंगणा), महेबुब बागवान (रा. हणेगाव), नंदकुमार आकुलवार (रा. तडगुर, तेलंगणा) व बारमालक परमेश देवरे (रा. मानूर) आदी चौदा लोकांना ताब्यात घेतले आहे.

त्यांच्याजवळील चार लाख बावीस हजार सहाशे रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी जुगार अड्डा चालतो, मात्र स्थानिक पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने दुर्लक्ष केले होते. पोलीस दलात झालेल्या फेरबदलात हि धाडसी कार्यवाही शक्य झाल्याने सुजाण नागरिक सांगत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर, उपनिरीक्षक दिनेश येवले, जमादार प्रभाकर कदम, राजेंद्र वाघमारे, विष्णू चामलवाड, ग्यानोबा केंद्रे आदींनी हि कार्यवाही केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded : gambling house demolished; Fourteen were detained