नांदेड-हैदराबाद विमानसेवा सुरू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

नांदेड - कमी दरात सर्वसामान्यांना हवाई सफर घडविणाऱ्या "उडान' योजने अंतर्गत नांदेड- हैदराबाद विमानसेवेला गुरुवारपासून (ता. 27) सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिमला येथून सकाळी दहाला व्हिडिओ लिंकद्वारे या सेवेचे उद्‌घाटन केले. या वेळी नांदेडच्या श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावर झालेल्या कार्यक्रमात कॉंग्रेस-भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांत श्रेयावरून घोषणाबाजी झाली. काही नेत्यांनी आवाहन केल्यानंतर ही घोषणाबाजी थांबली. 

नांदेड - कमी दरात सर्वसामान्यांना हवाई सफर घडविणाऱ्या "उडान' योजने अंतर्गत नांदेड- हैदराबाद विमानसेवेला गुरुवारपासून (ता. 27) सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिमला येथून सकाळी दहाला व्हिडिओ लिंकद्वारे या सेवेचे उद्‌घाटन केले. या वेळी नांदेडच्या श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावर झालेल्या कार्यक्रमात कॉंग्रेस-भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांत श्रेयावरून घोषणाबाजी झाली. काही नेत्यांनी आवाहन केल्यानंतर ही घोषणाबाजी थांबली. 

येथील विमानतळावर झालेल्या कार्यक्रमाला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील, कॉंग्रेसचे आमदार डी. पी. सावंत, अमर राजूरकर, भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड, महापौर शैलजा स्वामी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर, विमानतळ विभागाचे किशनलाल शर्मा आदी व्यासपीठावर होते. 

श्री. चव्हाण म्हणाले, ""येथून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी दोन- अडीच वर्षांपासून माझे प्रयत्न सुरू होते. आता ही सेवा सुरू झाल्याने मराठवाड्यातील नागरिकांसाठी आनंदाची बाब आहे.'' 

देशातील सव्वाशे कोटीपैकी 35 कोटी लोक विमान प्रवास करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना कमी दरात विमानसेवा मिळावी; यासाठी पंतप्रधान मोदी यांनी "उडान' ही महत्त्वाकांक्षी योजना आखल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. पूर्वी खास लोकांसाठी विमानसेवा मिळत होती. आता ती आम लोकांसाठी मिळणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांची ही योजना खूप चांगली असल्याचे निलंगेकर म्हणाले. 

रंगला श्रेयवाद 
भाषणांत श्रेयवाद आल्याने कॉंग्रेस-भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांसाठी घोषणाबाजी केली. "नांदेडकर टाळ्या वाजविण्याच्या बाबतीत तरबेज आहेत. या वेळी ठराविक वेळीच टाळ्या वाजत आहेत. पंतप्रधान मोदींनी सामान्यांसाठी आणलेल्या या योजनेचे टाळ्या वाजून स्वागत झाले पाहिजे,' असे मुंडे म्हणाल्या. उपस्थितांनी त्यांच्या आवाहनाला साद देण्याचा केलेला प्रयत्न कॉंग्रेस कार्यकर्त्यांना रुचला नाही. "अशोक चव्हाण जिंदाबाद, कॉंग्रेस पक्षाचा विजय असो,' अशा घोषणा द्यायला त्यांनी सुरवात केली. प्रत्युत्तरादाखल भाजप पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी "मोदी... मोदी..मोदी...' अशा घोषणा सुरू केल्या. 

हा कार्यक्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मुंडेंच्या वक्तव्यामुळे भाजपला श्रेय मिळतेय; म्हणून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्याचे समर्थन केले जात होते. अशा कार्यक्रमात गोंधळ घालणे योग्य नसल्याचे निलंगेकर म्हणाले. "आम्ही सगळे नेते आनंदाने एकत्र बसलो आहोत. हे आंदोलनाचे व्यासपीठ नाही. मराठवाड्याच्या चांगल्या संस्कृतीचे प्रदर्शन घडवा,' असे आवाहन करत मुंडेंनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. आमदार राजूरकर यांनीही कार्यकर्त्यांना शांत केले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सिमल्याहून व्हिडिओ लिंकद्वारे योजनेचे उद्‌घाटन केले. त्यांचे भाषण झाले. 

नांदेड, लातूर, परळीचे प्रेम वाढेल 
नांदेडहून सुरू झालेल्या विमानसेवेचा फायदा नांदेडसह लातूर, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ आदी जिल्ह्यांना होईल, असे आमदार सावंत म्हणाले. मराठवाड्यातील पर्यटक, शीख भाविकांना या सेवेद्वारे मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे श्री. चव्हाण म्हणाले. हाच धागा पकडून मुंडे म्हणाल्या, ""आम्हा लोकप्रतिनिधींनाही या सुविधेचा फायदा होईल. नांदेडला येणे वाढेल. नांदेड, लातूर आणि परळीचे प्रेम वाढेल.'' 

Web Title: Nanded-Hyderabad flight service started