कर्जमाफी धोरणाच्या नैराश्‍यातून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
नांदेड - कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याच्या नैराश्‍यातून कंधार तालुक्‍यातील काटकळंबा येथील काशीनाथ कोळगिरे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येची उच्चस्तरीय चौकशी करून प्रशासनातील दोषींवर कारवाईची मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सरकारने ठराविक थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतची कर्जमाफी केली. त्यामुळे उसनवारीने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला. सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाविरोधात कंधार तालुक्‍यातील काटकळंबा येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामुदायिक शपथही घेतली. नियमित कर्ज भरणाऱ्या येथील पन्नासच्या वर शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत त्यांच्या भावना लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना कळवल्या. या संवेदनशील प्रकरणाची चौकशीही प्रशासनाकडून करण्यात आली नाही किंवा शेतकऱ्यांच्या मतपरिवर्तनाची तसदीही घेतली नाही. त्यामुळे कर्जमाफी धोरणाच्या नैराश्‍यातून रविवारी (ता. 2) कोळगिरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
Web Title: nanded marathwada farmer suicide