डास, चिलटांमुळे भूकंप होत नसतात - गणेश हाके

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

नांदेड - जनतेने निवडून दिलेले भाजपचे सरकार केंद्रात आणि राज्यातही पाच वर्षे पूर्ण करेल. त्यामुळे मुदतपूर्व निवडणुकीचा प्रश्नच उद्‌भवत नाही. डास आणि चिलटांमुळे कोणतेही भूकंप होत नसतात, असे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केले असून, यानिमित्ताने भाजपने शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे.

केंद्र सरकारला तीन वर्षे आणि राज्य सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पक्ष प्रवक्ते हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या वेळी हाके यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या राजकीय भूकंपाच्या विधानावर वक्तव्य केले.

सत्तेत शिवसेना आमच्यासोबत सहभागी असल्यामुळे त्यांना अशी भूकंपाची भाषा शोभत नाही. भूकंप ही नैसर्गिक आपत्ती असून, ती अशी येत नाही. जनतेने भाजपला निवडून देऊन इतर पक्षांत आधीच भूकंप केला आहे. त्यामुळे डास आणि चिलटांच्या सांगण्यावरून भूकंप होत नसतात, असा टोलाही हाके यांनी लगावला.

या डास, चिलटांवर काही उपाययोजना किंवा पेस्ट कंट्रोल करणार का? असे पत्रकारांनी विचारले असता हाके म्हणाले, की जनतेने आधीच मतदानाच्या माध्यमातून त्यांच्यावर फवारणी केली आहे. आमच्याकडेही योग्यवेळी योग्य निर्णय घेतले जातील. शेतकऱ्यांचा संप सुरू झाला तेव्हा पहिले सहा दिवस शिवसेना कुठे होती? आता श्रेय घेण्याचा प्रकार हास्यास्पद आहे.

Web Title: nanded marathwada news ganesh hake talking